Maharashtra School Admission Age Limit: महाराष्ट्रातील पालकांसाठी शाळा प्रवेशासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी आणि इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी मुलांचे किमान वय निश्चित करण्याचे निकष जाहीर करण्यात आले आहेत. हे नियम कोणत्या शैक्षणिक वर्षांपासून लागू होणार आणि प्रवेशासाठी मुलांचे वय किती असणे आवश्यक आहे? जाणून घ्या सविस्तर.
School Admission Age Limit: महाराष्ट्रातील शाळांमध्ये (School Admission Age Limit) आपल्या मुलाला प्रवेश देण्याची तयारी करणाऱ्या पालकांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पूर्वप्राथमिक वर्गापासून इयत्ता पहिलीपर्यंत प्रवेशासाठी बालकांचे किमान वय (Nursery Admission) निश्चित करण्याबाबत नवा शासन निर्णय जारी केला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार हे नियम टप्प्याटप्याने (Maharashtra Education Department) लागू केले जाणार आहेत. नव्या तरतुदींनुसार, प्रवेशासाठी निर्धारित वय ३० जूनपर्यंत पूर्ण असणे आवश्यक असेल. मात्र, प्रत्येक वर्गासाठी वयोमर्यादा लागू होण्याचे वर्ष वेगवेगळे असल्याने पालकांनी प्रवेशाचे वेळापत्रक ( Maharashtra School Admission Rules ) समजून घेणे महत्वाचे आहे.
हेही वाचा: डोंगराळे चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरणाचा आज निकाल; विजय खैरनारला फाशी की जन्मठेप?
नर्सरीपासून पहिलीपर्यंत प्रवेशाचे नियम कसे असतील?
राज्य सरकारच्या निर्णयानुसार, बालवाटिका आणि इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी वयाची अट टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे. यामुळे मुलांच्या शालेय शिक्षणाची सुरुवात ठरावीक वयात होण्यास मदत होईल.
प्रवेशासाठी निश्चित केलेले वय आणि नियम लागू
नर्सरी (बालवाटिका-1): शैक्षणिक वर्ष 2027-28 पासून प्रवेशासाठी 3 वर्षे पूर्ण असणे आवश्यक.
ज्युनिअर केजी (बालवाटिका-2): शैक्षणिक वर्ष 2028-29 पासून 4 वर्षे पूर्ण असणे आवश्यक.
सिनिअर केजी (बालवाटिका-3): शैक्षणिक वर्ष 2029-30 पासून 5 वर्षे पूर्ण असणे आवश्यक.
इयत्ता पहिली: शैक्षणिक वर्ष 2030-31 पासून 6 वर्षे पूर्ण असणे आवश्यक.
या नियमांनुसार, संबंधित शैक्षणिक वर्षात 30 जूनपर्यंत बालकाचे निर्धारित वय पूर्ण होणे अपेक्षित आहे.
सध्याच्या विद्यार्थ्यांना नव्या नियमांचा फटका बसणार का?
नवीन वयोमर्यादा लागू करताना सध्या शिक्षण घेत असलेल्या मुलांची गैरसोय होऊ नये, यासाठी काही सवलती देण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद असल्याची माहिती आहे.
शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये नर्सरीपासून इयत्ता पहिलीपर्यंत शिकणाऱ्या विद्यमान विद्यार्थ्यांना नव्या वयोमर्यादेचे निकष लागू होणार नाहीत.
मान्यताप्राप्त शाळेतून मागील इयत्ता यशस्वीपणे पूर्ण केलेल्या नियमित विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देताना नव्या वयाच्या निकषांतून सूट देण्यात आली आहे.
पूर्वप्राथमिक ते पहिलीच्या प्रवेशासाठी किमान आणि कमाल वयोमर्यादेत 15 दिवसांची सूट देण्याचे अधिकार शाळाप्रमुखांना देण्यात आल्याचे सांगितले जाते.
या सवलतींचा लाभ कोणत्या परिस्थितीत मिळेल, याबाबत पालकांनी शासन निर्णय आणि पुढील अधिकृत मार्गदर्शक सूचना तपासाव्यात.
CBSE, ICSE आणि IB शाळांनाही नियम लागू होणार?
महाराष्ट्रातील विविध शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी वयाचे निकष वेगवेगळे असण्याचा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. नव्या निर्णयानुसार, राज्य मंडळासोबतच CBSE, ICSE आणि IB अभ्यासक्रमांच्या शाळांमध्येही प्रवेशाचे एकसमान वयाचे निकष लागू करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत बालशिक्षणाची रचना अधिक सुसंगत करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वप्राथमिक शिक्षणापासून पहिलीपर्यंत मुलांचे वय आणि शैक्षणिक टप्पा यांचा मेळ राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
प्रवेश घेण्यापूर्वी पालकांनी काय काळजी घ्यावी?
मुलाच्या प्रवेशाचे नियोजन करताना पालकांनी संबंधित शैक्षणिक वर्ष, बालकाची जन्मतारीख आणि प्रवेशासाठी लागू असलेली वयोमर्यादा तपासणे आवश्यक आहे. तसेच शाळेने जाहीर केलेल्या प्रवेशाच्या तारखा आणि शिक्षण विभागाच्या सूचनांकडे लक्ष द्यावे.
प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्याकडून प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अंतिम निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत शासन निर्णय आणि संबंधित शाळेची माहिती तपासणे महत्त्वाचे ठरेल.









