• Home
  • ताज्या बातम्या
  • पवार-अदानींच्या 30 वर्षांच्या मैत्रीची कहाणी काय? 2019 च्या बैठकीत काय घडलं?
राजकारण

पवार-अदानींच्या 30 वर्षांच्या मैत्रीची कहाणी काय? 2019 च्या बैठकीत काय घडलं?

Pawar Adani Connection
10

Pawar Adani Connection: एकीकडे देशाच्या राजकारणात अदानींच्या नावावरून आरोप-प्रत्यारोप होतात… संसदेत गदारोळ होतो… काँग्रेसचे नेते राहुल गांधी अदानी आणि भाजपच्या संबंधांवर प्रश्न उपस्थित करतात… पण याच विरोधी पक्षांच्या राजकारणात एक असं नाव आहे, ज्यांचं गौतम अदानींसोबतचं नातं आजचं नाही, कालचं नाही… तर जवळपास तीन दशकांपूर्वीचं आहे… ते नाव म्हणजे राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), एकीकडे राजकीय विरोध… दुसरीकडे वैयक्तिक मैत्री… एकीकडे अदानींवर आरोप…

तर दुसरीकडे पवारांकडून अदानींच्या उद्योगप्रवासाचं कौतुक, आणि आता मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांच्या भेटीसाठी गौतम अदानी गेल्याचं वृत्त समोर आल्यानंतर या जुन्या संबंधांची पुन्हा चर्चा सुरू झालीय… पण प्रश्न असा आहे की, एका उद्योगपतीचं आणि एका राजकीय नेत्याचं नातं इतकी वर्षं कसं टिकून राहिलं? अदानींच्या उद्योगविस्तारात शरद पवारांची नेमकी भूमिका काय होती? २०१९ मध्ये अदानींच्या घरी झालेल्या राजकीय बैठकीत नेमकं काय घडलं? आणि काँग्रेस अदानींवर टीका करत असताना शरद पवारांची भूमिका वेगळी का दिसते?

30 वर्षांपूर्वी दोघांची मैत्री कशी सुरू झाली? (Pawar Adani Connection)

गोष्ट सुरू होते नव्वदच्या दशकात… त्या काळात शरद पवार (Sharad Pawar) महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात महत्त्वाचं नाव बनले होते. दुसरीकडे गुजरातमधील एक उद्योजक आपला व्यवसाय विस्तारत होता. त्या उद्योजकाचं नाव होतं गौतम अदानी (Gautam Adani). आज अदानी म्हटलं की बंदरं, विमानतळ, वीज प्रकल्प, ऊर्जा क्षेत्र आणि हजारो कोटींचे उद्योग डोळ्यांसमोर येतात. पण अदानींचा सुरुवातीचा प्रवास हा कमोडिटी ट्रेडिंगपासून सुरू झाला होता. शरद पवार आणि गौतम अदानी यांची ओळख याच उद्योगविस्ताराच्या काळात झाली. पुढे ही ओळख मैत्रीत बदलली.

विशेष म्हणजे, या संबंधांचा उल्लेख खुद्द शरद पवारांनी आपल्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात केला आहे. पवारांनी अदानींच्या उद्योगप्रवासाबद्दल लिहिताना त्यांच्या कष्टाचं आणि व्यावसायिक धाडसाचं कौतुक केलं आहे. इतकंच नाही, तर अदानींनी औष्णिक वीजनिर्मितीच्या क्षेत्रात उतरावं, असा सल्ला आपण दिल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. आता इथेच या गोष्टीला एक वेगळं वळण मिळतं. कारण आज देशातील ऊर्जा क्षेत्रात अदानी समूहाचं मोठं स्थान आहे. आणि या क्षेत्रात प्रवेश करण्याचा सल्ला शरद पवारांनी दिल्याचा उल्लेख त्यांच्या पुस्तकात सापडतो. मात्र, याचा अर्थ अदानी समूहाच्या संपूर्ण उद्योगविस्तारामागे पवार होते, असा होत नाही. हा त्यांच्या दीर्घकालीन संबंधांचा एक महत्त्वाचा दाखला आहे.

अदानींच्या दिल्लीतील घरी झालेल्या बैठकीत काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमाला शरद पवार (Sharad Pawar) आणि गौतम अदानी उपस्थित होते. त्यावेळी पवार केंद्रीय कृषिमंत्री होते. या कार्यक्रमात पवारांनी अदानींना औष्णिक वीजनिर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. पुढे अदानी समूहाने गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे औष्णिक वीज प्रकल्प उभारला. हा प्रकल्प पवार आणि अदानी यांच्या संबंधांमधील एक महत्त्वाचा संदर्भ मानला जातो. पण या सगळ्यात प्रफुल्ल पटेल यांचं नावही महत्त्वाचं ठरतं. कारण तिरोडा प्रकल्प उभारण्यात आलेला गोंदिया परिसर हा पटेल यांचा राजकीय प्रभाव असलेला भाग होता. म्हणजेच, इथे तीन नावं एकत्र येतात. शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि गौतम अदानी! अर्थात, राजकीय नेत्याने उद्योगपतीला गुंतवणुकीचा सल्ला देणं आणि त्या उद्योगपतीला नियमबाह्य फायदा मिळवून देणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण पवार आणि अदानी यांच्या संबंधांची खरी राजकीय चर्चा सुरू होते २०१९ मध्ये.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता. भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून मतभेद निर्माण झाले होते. राज्यात सरकार स्थापनेचा पेच निर्माण झाला होता. याच काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात काही चर्चा झाल्याचं पुढे समोर आलं. आणि या चर्चेचा एक पत्ता होता, दिल्लीतील गौतम अदानी यांचं निवासस्थान! नोव्हेंबर २०२४ मध्ये अजित पवारांनी २०१९ मधील बैठकीबाबत केलेल्या विधानांमुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला. त्यानंतर न्यूज लॉन्ड्री आणि द न्यूज मिनिटला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी अदानींच्या घरी बैठक झाल्याचं मान्य केलं. पवारांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रवादीतील काही नेत्यांना आपल्यावरील तपास आणि खटल्यांची चिंता होती. भाजपसोबत गेल्यास या अडचणी दूर होतील, असं काही सहकाऱ्यांना वाटत होतं. मात्र, अशा आश्वासनांवर आपला विश्वास नव्हता, असं पवारांनी सांगितलं.

मग चर्चा करण्यासाठी भेट ठरली. आणि ती भेट अदानींच्या निवासस्थानी झाली. इथे सर्वात महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला. अदानींच्या घरीच ही बैठक का झाली? पवारांनी सांगितलं की, अदानींशी आपली जुनी ओळख असल्याने त्यांच्या घरी भेट घेण्याचं सुचवलं होतं. पण गौतम अदानी (Gautam Adani) त्या राजकीय चर्चेत सहभागी होते का? यावर पवारांचं उत्तर स्पष्ट होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार, अदानी हे त्या बैठकीचे यजमान होते. त्यांनी राजकीय चर्चेत सहभाग घेतला नाही. मात्र, ही बैठक अदानींच्या घरी झाली, एवढं वास्तवही राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं होतं. कारण महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या गुंतागुंतीच्या काळात एका मोठ्या उद्योगपतीचं घर राजकीय नेत्यांच्या बैठकीचं ठिकाण बनलं होतं. यातून अदानींनी सरकार स्थापनेचा निर्णय घेतला किंवा पक्षफूट घडवली, असा निष्कर्ष काढता येत नाही. पण राजकारण आणि उद्योगक्षेत्रातील जवळच्या संबंधांवर चर्चा होण्यासाठी ही घटना पुरेशी ठरली.

हेही वाचा : अशोक खरातची भूमिका कोण साकारणार? महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स’मध्ये कोण कोणते कलाकार?

पुण्यातील भेटी आणि बारामतीच्या AI सेंटरचा संबंध

आता आपण थेट २०२३ मध्ये येऊया. जानेवारी २०२३ मध्ये अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाविरोधात गंभीर आर्थिक आरोप करणारा अहवाल प्रसिद्ध केला. अदानी समूहाने हे आरोप फेटाळून लावले. मात्र, भारताच्या राजकारणात या अहवालामुळे मोठी खळबळ उडाली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधांवर प्रश्न उपस्थित केले. विरोधी पक्षांनी संयुक्त संसदीय समितीमार्फत, म्हणजेच JPC मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. पण इथे शरद पवारांची भूमिका वेगळी होती. पवारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालील समितीमार्फत चौकशी करण्याला प्राधान्य दिलं. त्यांच्या मते, या प्रकरणातील सत्य शोधणं महत्त्वाचं होतं.

केवळ एखाद्या उद्योगपतीचं नाव घेऊन राजकीय आरोप करणं पुरेसं नव्हतं. त्यामुळे एक प्रश्न चर्चेत आला. काँग्रेस अदानी समूहाविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना त्याच विरोधी राजकीय आघाडीतील शरद पवार वेगळी भूमिका का मांडत होते? या प्रश्नाचं एक उत्तर पवारांच्या राजकीय दृष्टिकोनात सापडतं. त्यांनी अनेकदा उद्योग आणि राजकारण यांच्यातील संवाद आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. मात्र, पवारांची ही भूमिका योग्य की अयोग्य, याबाबत राजकीय पक्षांमध्ये मतभेद कायम राहिले.

हिंडेनबर्ग प्रकरणानंतरही शरद पवार आणि गौतम अदानी (Pawar Adani Connection) यांच्या भेटी सुरूच राहिल्या. सप्टेंबर २०२३ मध्ये पवार गुजरातमधील अहमदाबाद येथे अदानी समूहाशी संबंधित लॅक्टोफेरिन प्रकल्पाच्या उद्घाटनाला उपस्थित राहिले. त्यांच्या या भेटीचे फोटोही समोर आले. एकीकडे देशभरात अदानी समूहावरून राजकीय आरोप सुरू होते. तर दुसरीकडे पवार आणि अदानी सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसत होते. यातून एक गोष्ट स्पष्ट होत होती. देशातील पक्षीय राजकारणातील मतभेद आणि पवार-अदानी यांचे वैयक्तिक संबंध या दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू होते. यानंतर मे २०२५ मध्ये पुण्यात शरद पवार आणि गौतम अदानी यांची पुन्हा भेट झाली. पुण्यातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कमध्ये दोघे दोन तासांहून अधिक काळ एकत्र होते. या भेटीत तंत्रज्ञान, स्टार्टअप्स आणि समाजोपयोगी प्रकल्पांबाबत माहिती घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या भेटीचा राजकारणाशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, पवार आणि अदानी यांच्यातील प्रत्येक भेट राजकीय चर्चेचा विषय बनत असल्याचं या निमित्ताने पुन्हा दिसून आलं.

विद्या प्रतिष्ठानच्या AI केंद्राच्या उद्घाटनात गौतम अदानींनी काय सांगितलं?

आता या संपूर्ण गोष्टीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा. २८ डिसेंबर २०२५. ठिकाण होतं, बारामती! विद्या प्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं उद्घाटन गौतम अदानी यांच्या हस्ते झालं. या केंद्राला अदानी समूहाकडून आर्थिक सहकार्य मिळालं होतं. या कार्यक्रमात गौतम अदानी यांनी शरद पवारांचा उल्लेख आपले मार्गदर्शक असा केला. पवारांना आपण तीन दशकांहून अधिक काळ ओळखत असल्याचं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही, तर सुप्रिया सुळे यांनीही दोन्ही कुटुंबांमधील जवळच्या संबंधांवर भाष्य केलं. गौतम अदानी आपल्यासाठी मोठ्या भावासारखे असल्याचं त्यांनी सांगितलं. तर अदानी यांच्या पत्नी प्रीती अदानी यांच्याशीही कौटुंबिक जिव्हाळ्याचं नातं असल्याचं स्पष्ट केलं. या कार्यक्रमात शरद पवारांनीही अदानींच्या उद्योगप्रवासाचं कौतुक केलं. म्हणजे पवार-अदानी यांचं नातं केवळ राजकीय ओळखीपुरतं मर्यादित नसून ते कौटुंबिक आणि शैक्षणिक सहकार्यापर्यंत पोहोचल्याचं सार्वजनिकरीत्या समोर आलं.

या कार्यक्रमानंतर आणखी एक राजकीय वाद निर्माण झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीबाबत गौतम अदानींवर आरोप केला. शरद पवारांनीही यापूर्वी २०१९ च्या बैठकीत अदानींनी राजकीय चर्चेत सहभाग घेतला नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे अदानींच्या घरी बैठक झाली, हे पवारांनी मान्य केलेलं वास्तव आहे. पण अदानींनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, हा राजकीय आरोप आहे. या दोन गोष्टींची गल्लत करता येणार नाही.

हेही वाचा : Diwali Wishes in Marathi: दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा

शरद पवारांच्या प्रकृतीबाबत काय माहिती समोर आली?

आता या गोष्टीचा सर्वात ताजा अध्याय. ६ नोव्हेंबर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांवर उपचार सुरू आहेत. श्वसनाशी संबंधित संसर्ग आणि छातीतील त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आणि याच रुग्णालयात सकाळी उद्योगपती गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले. अदानींनी पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीच्या आधी प्रफुल्ल पटेल यांनीही पवारांची रुग्णालयात भेट घेतली होती. अर्थात, अदानींची आजची भेट प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आहे. पण तीस वर्षांच्या संबंधांचा इतिहास लक्षात घेतला, तर अदानींची ही भेट त्या दीर्घकालीन मैत्रीच्या पार्श्वभूमीवर पाहिली जात आहे.

एका बाजूला उद्योगक्षेत्रात मोठं साम्राज्य उभं करणारे गौतम अदानी… दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात अनेक दशकं सक्रिय असलेले शरद पवार… गोंदियातील वीज प्रकल्पाचा सल्ला… २०१९ मधील दिल्लीची बैठक… हिंडेनबर्ग प्रकरणात घेतलेली वेगळी भूमिका… पुण्यातील भेटी… बारामतीतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स केंद्र… आणि आता ब्रीच कँडी रुग्णालयातील भेट… या सगळ्या घटनांना जोडणारा एक समान धागा आहे, तो म्हणजे दोघांमधील जुनी ओळख आणि मैत्री.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts