Rohit Pawar PA Daughter: अजित पवारांच्या विमान अपघातानंतर बारामतीतून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या १२ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेमागचं नेमकं कारण काय? चला, जाणून घेऊया.
बारामती तालुक्यातील रुई परिसरात १२ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही मुलगी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा: पोषण आहाराचा ‘कच्चा’ मुद्दा मांडणाऱ्या सेविकेला अखेर न्याय; सेवामुक्तीचा आदेश रद्द
प्राथमिक माहितीनुसार, रात्री घरात आई आणि मुलीमध्ये किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर मुलगी घराबाहेर पडली. बराच वेळ ती परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. त्यानंतर ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यात आली. दरम्यान, सकाळच्या सुमारास घराच्या परिसरातच मुलीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी फॉरेन्सिक पथक दाखल
बारामतीतील रुई येथील साई गणेश नगर परिसरात ही घटना घडली. मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी सुरू केली असून फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत सध्या कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. हा प्रकार घातपाताचा आहे की अन्य कोणत्या कारणामुळे मुलीचा मृत्यू झाला, हे तपास आणि वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
पोलिसांचा तपास सुरू
मुलगी घरातून बाहेर का पडली, त्यानंतर ती कुठे गेली आणि सकाळी तिचा मृतदेह घराजवळ कसा आढळला, या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. परिसरातील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि संबंधित व्यक्तींची माहिती तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.
या घटनेमुळे रुई परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार बारामतीत दाखल होणार असल्याची माहिती आहे.
मुलीच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याबाबत पोलिसांच्या तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.









