जीवन सोनवणे | भोर प्रतिनिधी
Whale Vomit Smuggling : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील महाडनाका येथे नाकाबंदीदरम्यान व्हेल माशाच्या उलटीच्या कथित तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. भोर पोलिस आणि वनविभागाच्या कारवाईत दोन वाहनांतून अंदाजे पाच किलो संशयित अंबरग्रीस जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पाच आरोपींविरोधात वनगुन्हा दाखल करण्यात आला असून, या कथित व्यवहारामागील साखळीचा तपास सुरू आहे.
नाकाबंदीदरम्यान दोन वाहनांची तपासणी
वनविभागाच्या कागदपत्रांनुसार, १० ऑक्टोबर २०२६ रोजी भोर येथील महाडनाका परिसरात नाकाबंदी सुरू होती. रात्री सुमारे आठ वाजून दहा मिनिटांच्या सुमारास स्कोडा रॅपिड आणि इनोव्हा या दोन वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी दोन्ही वाहनांमध्ये संशयास्पद पदार्थ आढळून आला.
स्कोडा रॅपिड (MH46 T 8600) या वाहनातील काळ्या पिशवीत अंदाजे एक किलो, तर इनोव्हा (MH04FF0075) या वाहनातील निळ्या प्लास्टिक पिशवीत अंदाजे चार किलो पदार्थ आढळल्याची नोंद वनविभागाच्या कागदपत्रांत आहे. दोन्ही वाहनांतून एकूण सुमारे पाच किलो पदार्थ जप्त करण्यात आला.
हेही वाचा : शिक्रापूरमध्ये चोरट्यांचा हैदोस! एकाच रात्री १३ दुकाने फोडली; सीसीटीव्हीत शस्त्रधारी चोरटे कैद
पाच आरोपींविरोधात वनगुन्हा दाखल
या प्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. वनविभागाने ११ ऑक्टोबर २०२६ रोजी वनगुन्हा क्रमांक ०४/२०२६ नुसार गुन्हा नोंदविला आहे. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील संबंधित तरतुदींनुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे.
जप्त पदार्थाचा स्रोत शोधण्याचे आव्हान ( Whale Vomit Smuggling )
जप्त केलेला पदार्थ नेमका अंबरग्रीस आहे का, तो कुठून आणण्यात आला आणि कोणाला विक्रीसाठी नेला जात होता, याची तपासणी सुरू आहे. तसेच या कथित व्यवहारामागे आणखी कोणाचे जाळे आहे का, याचाही तपास केला जात आहे. दोन्ही वाहनांचा या प्रकरणातील सहभाग आणि आरोपींचे संभाव्य संपर्क याबाबत तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाकडून सुरू आहे.









