Dahi Handi History Maharashtra : मुंबई ठाण्यासह इतर ठिकाणी सध्या दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे….सगळीकडे साऊंड सिस्टम, लाईट्स, डान्स पाहायला मिळत आहे…मोठं मोठ्या दहीहंडीच्या कार्यक्रमाला बॉलिवूड सेलिब्रिटी, मराठी अॅक्टर हजेरी लावताना पाहायला मिळत आहे…पण दहीहंडीचा हा उत्सव महाराष्ट्रात कधीपासून सुरू झाला? पूर्वीचा आणि आताच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात काय बदल आहे? असे काही प्रश्न निर्माण झाले आहेत….पाहूयात महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव कधीपासून सुरू झाला…
महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव कधीपासून सुरू झाला? ( Dahi Handi History Maharashtra )
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीत सण-उत्सवांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे… वर्षभरात येणाऱ्या विविध सणांपैकी श्रावण महिन्यातील गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा ‘दहीहंडी’ ( Dahi Handi ) उत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो…भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांचा संदेश देणारा हा पारंपरिक उत्सव आज केवळ धार्मिक विधी पुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याने एका भव्य, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या साहसी खेळाचे आणि कोट्यवधी रुपयांच्या व्यावसायिक इव्हेंटचे स्वरूप धारण केले आहे… गल्लीबोळातील लहान मुलांच्या छोट्या मानवी मनोऱ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज मुंबई-ठाण्यातील बहुमजली लोखंडी सांगाडे, टीव्ही वाहिन्यांचे थेट प्रक्षेपण आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या ग्लॅमरपर्यंत कसा पोहोचला, हा इतिहास अत्यंत रंजक आणि तितकाच विचार करायला लावणारा आहे….
भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांवर आधारित हा सण महाराष्ट्रात शेकडो वर्षांपासून पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीने घराघरांमध्ये आणि मंदिरांमध्ये साजरा केला जात होता… परंतु, या सणाला सार्वजनिक आणि संघटित रूप मिळण्याची सुरुवात विसाव्या शतकाच्या सुरुवातीला झाली… ऐतिहासिक नोंदींनुसार, सन 1907 मध्ये नवी मुंबईतील घणसोली गावात असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात पहिल्यांदा सार्वजनिक रित्या मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्यास सुरुवात झाली, असे म्हटले जाते…याच काळात महाराष्ट्रातील सार्वजनिक उत्सवांची सामाजिक आणि सामुदायिक भूमिका वाढत गेली… सार्वजनिक गणेशोत्सवाने निर्माण केलेल्या वातावरणाच्या समांतर, दहीहंडीही मुंबईतील वस्त्या, चाळी आणि स्थानिक समुदायांच्या सहभागातून अधिक संघटित स्वरूपात विकसित होत गेली… मुंबई आणि पुण्यातील कामगार वस्त्या, चाळी आणि पेठांमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला एकत्र आणण्यासाठी या सणाचा वापर सामाजिक व्यासपीठ म्हणून केला जाऊ लागला, असंही म्हटलं जातं….
हेही वाचा : गणपतीसाठी कोकणात जाणार असाल तर मोठी बातमी! 173 एसटी बस आधीच फुल्ल; जादा बसेसची तयारी
श्रीकृष्णाच्या बाललीलांशी जोडलेला दहीहंडीचा उत्सव ( Dahi Handi )
पूर्वीच्या काळी दहीहंडीचे ( Dahi Handi ) स्वरूप अत्यंत साधे, कौटुंबिक आणि भक्तीभावाने भरलेले होते… त्या काळी आजच्यासारखी गगनचुंबी उंची किंवा लोखंडी कमानी नसायच्या… साधारणपणे 10 ते 15 फूट उंचीवर, गल्लीच्या मध्यभागी किंवा चाळीच्या दोन खांबांच्या मध्ये दोरीच्या साहाय्याने मातीचे मडके टांगले जायचे… ही मर्यादित उंची गाठण्यासाठी अवघे 3 ते 4 थरांचे मानवी मनोरे पुरेसे असायचे, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण अत्यंत नगण्य होते… या हंडीच्या मडक्यात खऱ्या अर्थाने दही, दूध, लोणी, लाह्या, पेढे, फळे आणि काकडी एकत्र करून तयार केलेला नैसर्गिक ‘गोपाळकाला’ भरला जायचा, अशी माहिती आहे… मुंबईतील गिरणगाव म्हणजेच लालबाग, परळ, काळाचौकी, दादर मधील चाळी हे दहीहंडीचे मुख्य केंद्र होते, अशी माहिती आहे… जिथे एका चाळीतील तरुण दुसऱ्या चाळीत जाऊन हंडी फोडायचे… यात कोणतीही व्यावसायिक स्पर्धा नसून शेजाऱ्यांमधील प्रेम आणि सलोखा असायचा… हंडी फोडताना लोक स्वतःच्या आवाजात, ढोलकीच्या किंवा केवळ हातांच्या टाळ्यांच्या तालावर पारंपरिक गाणी गात असत आणि बक्षीस म्हणून मिळणारा एक नारळ, चाळकरी नागरिकांनी स्वेच्छेने जमवलेले काही मोजके रुपये सन्मानाने स्वीकारले जायचे…
1990 च्या दशकानंतर आणि विशेषतः सन 2000 च्या सुरुवातीला भारतामध्ये जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले, ज्याचा थेट परिणाम या सणावर झाला आणि त्याचे रूपांतर स्थानिक सामुदायिक उत्सवापासून मोठ्या सार्वजनिक आणि व्यावसायिक सोहळ्याकडे प्रवास झाला…पूर्वी नारळ आणि काही रुपयांवर समाधान मानणाऱ्या या सणात आता कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते… मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरांमधील मोठ्या राजकीय नेत्यांच्या आणि प्रतिष्ठानच्या हंड्यांची बक्षिसे आता 11 लाख, 25 लाख ते अगदी 51 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहेत, ज्यामध्ये सोन्याची नाणी आणि परदेश वारी यांसारखी बक्षिसे दिली जातात…. बक्षिसांची रक्कम जशी वाढली, तशी हंडीची उंचीही 40 ते 50 फुटांवर गेली असून गोविंदा पथके 8, 9 आणि अगदी 10 थरांचे मानवी मनोरे रचून जागतिक विक्रम नोंदवू लागली आहेत… सध्याच्या दहीहंडी कार्यक्रमांचे मुख्य आकर्षण हे केवळ हंडी फोडणे राहिले नसून तिथे येणारे बडे बॉलिवूड स्टार्स हे बनले आहे…नृत्यांगणा गौतमी पाटील दहीहंडी कार्यक्रमामध्ये मुख्य आकर्षण पाहायला मिळत आहेत…. प्रचंड मोठे स्क्रीन्स, लेझर लाईट्स आणि डीजेच्या तालावर लाखो लोकांची होणारी गर्दी या कार्यक्रमांना थेट एका मोठ्या संगीत महोत्सवाचे स्वरूप देते….
सुरक्षित आणि शिस्तबद्ध उत्सवातून परंपरेचे वैभव टिकवण्याचे आवाहन
दहीहंडीमध्ये वाढणारा धोका आणि गोविंदांचा उत्साह लक्षात घेऊन, महाराष्ट्र शासनाने दहीहंडीला अधिकृतपणे ‘साहसी खेळ’ म्हणून मान्यता दिली आहे… या एका निर्णयामुळे दहीहंडीचे स्वरूप कायदेशीररित्या बदलले असून आता गोविंदा पथके ऑलिम्पिक खेळाडूंप्रमाणे “अनेक गोविंदा पथके आता दहीहंडीच्या काही आठवडे आधीपासून जिममध्ये, मॅटवर आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मानवी मनोऱ्यांचा सराव करतात… उच्च न्यायालयाच्या आणि सरकारच्या नियमांनुसार, आता हंडीच्या ठिकाणी सुरक्षा जाळ्या, गोविंदांसाठी हेल्मेट, चेस्ट गार्ड आणि सेफ्टी बेल्ट वापरणे सक्तीचे करण्यात आले असून दुर्घटना घडल्यास प्रत्येक गोविंदाचा 10 लाख रुपयांचा विमा उतरवला जातो…. या सणाला खेळाचा दर्जा मिळाल्यामुळे, गोविंदांना आता सरकारी नोकऱ्यांमध्ये 5 टक्के क्रीडा कोट्यातून आरक्षण मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे….
Dahi Handi Political Events : आजच्या घडीला मुंबई आणि ठाण्यातील दहीहंडी हा केवळ संस्कृतीचा भाग राहिलेला नाही, तर तो राजकीय पक्षांच्या शक्तीप्रदर्शनाचा सर्वात मोठा आखाडा बनला आहे… विविध राजकीय पक्षांचे नेते कोट्यवधी रुपये खर्च करून अशा भव्य हंड्यांचे आयोजन करतात आणि या माध्यमातून तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो…महाराष्ट्रातील दहीहंडीचा उगम ते आधुनिक स्वरूप हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे… लाखांची बक्षिसे, तरुणांना मिळणारा खेळाचा दर्जा आणि जागतिक ओळख हे नक्कीच चांगली गोष्ट आहे…. मात्र हे सर्व करत असताना सणाचा मूळ गाभा असलेला भक्तीभाव, सामाजिक सलोखा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवी जीवाचे मूल्य विसरून चालणार नाही… मात्र दहीहंडीचा थर लावताना घडणाऱ्या दुर्घटनांमधून धडा घेऊन, आगामी काळात केवळ थरार आणि पैशांच्या मागे न धावता, अत्यंत सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा उत्सव साजरा केला, तरच महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक परंपरेचे वैभव खऱ्या अर्थाने टिकून राहील….







