• Home
  • राजकारण
  • “…हे सिस्टीमने केलेले खून” NEET पेपर फुटीवर अमित ठाकरे संतापले
Top News

“…हे सिस्टीमने केलेले खून” NEET पेपर फुटीवर अमित ठाकरे संतापले

Amit Thackeray on NEET paper leak

Amit Thackeray on NEET paper leak : नीट-युजी २०२६ (NEET-UG 2026) परीक्षेच्या पेपर फुटी घोटाळ्यामुळे (Paper Leak Scam) देशभरात निर्माण झालेल्या संताप आणि नैराश्यात विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणावर मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “ही आत्महत्या नाही, तर या सिस्टीमने केलेला अधिकृत ‘खून’ आहे,” असे म्हटले आहे. अमित ठाकरे यांनी आज एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, परीक्षा रद्द झाल्याच्या धक्क्यातून राजस्थान, दिल्ली, गोवा, उत्तर प्रदेशसह विविध राज्यांमध्ये प्रामाणिक विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आपले आयुष्य संपवले. त्यांनी याला व्यवस्थेचा खून (The Murder of the System) म्हटले आणि केंद्र सरकार व एनटीएवर (Central Government and NTA) जोरदार टीका केली. “या संपूर्ण घोटाळ्याचे धागेदोरे महाराष्ट्राशी जोडले जात असल्याने लाज वाटते. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि या शिक्षण माफियांच्या मुसक्या आवळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असे अमित ठाकरेंनी स्पष्ट केले.

हेही वाचा – महिला अधिकाऱ्याला अश्लील मेसेज आणि धमकी; अजित पवार गटाचा ‘हा’ पदाधिकारी वादात!

धागेदोरे महाराष्ट्राशी जोडले जातात, तेव्हा खरंच लाज वाटते – अमित टाकरे

वर्षानुवर्षे डोळ्यात तेल घालून, दिवस-रात्र एक करून अभ्यास करायचा, आई-वडिलांनी शेतजमीन विकून किंवा कर्ज काढून क्लासेसची फी भरायची आणि परीक्षेच्या दिवशी या शिक्षण माफियांच्या मेहेरबानीमुळे पेपर फुटतो? आणि त्यावर उपाय काय… तर परीक्षा रद्द? यापेक्षा अजून किती खालची पातळी गाठणार आहे सरकार? या संपूर्ण घोटाळ्याचे धागेदोरे जेव्हा आपल्या महाराष्ट्राशी जोडले जातात, तेव्हा खरंच लाज वाटते.

ज्यांच्याकडे पैसा आहे ते डॉक्टर बनणार आणि प्रमाणिक आत्महत्येचा मार्ग

सीबीआय तपासातून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. लातूरचे मूळ रहिवासी असलेले आणि चक्क एनटीएच्या पेपर सेटिंग पॅनेलमध्ये समाविष्ट असलेले प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात आपल्या राहत्या घरी विशेष कोचिंगच्या नावाखाली त्यांनी मूळ प्रश्नपत्रिका आणि उत्तरे कोट्यवधी रुपयांना विकली. पुण्यातून सुरू झालेलं हे रॅकेट नाशिक, अहिल्यानगर, जयपूर ते थेट हरियाणामधील गुरुग्रामपर्यंत पसरलं आहे. १५ ते २० लाखांना एक-एक पेपर विकला गेला. म्हणजेच, ज्यांच्याकडे पैसा आहे ते डॉक्टर बनणार आणि जो प्रामाणिकपणे ६५० गुण मिळवण्याची क्षमता ठेवतो, त्याने आत्महत्येचा मार्ग निवडायचा?

शिक्षण माफियांच्या मुसक्या आवळण्याची हिम्मत नाहीये का या सरकारमध्ये?

या शिक्षण माफियांच्या आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची हिम्मत नाहीये का या सरकारमध्ये? केवळ परीक्षा रद्द करून आणि नवीन तारीख देऊन विद्यार्थ्यांचा मनस्ताप कमी होत नसतो. या संपूर्ण रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर आणि दलालांवर अशी कठोर कारवाई झाली पाहिजे की, पुन्हा कोणाचेही विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचे धाडस होणार नाही. प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि त्यांच्या पालकांचा आक्रोश वाया जाणार नाही.

काही शिक्षण संस्थांनी आणि प्राध्यापकांनी या पवित्र क्षेत्राला कलंकित केलंय

ज्या शिक्षण संस्थांनी आणि प्राध्यापकांनी या पवित्र क्षेत्राला कलंकित केलंय, त्यांच्या संपत्तीवर टांच आणली पाहिजे. हा लढा केवळ एका परीक्षेचा नाही, तर या देशातील गुणवत्तेचा आणि प्रामाणिकपणाचा आहे. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि या शिक्षण माफियांच्या मुसक्या आवळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, हा आमचा निर्धार आहे, असे अमित ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

२२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया

नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीायच्या तपासात लातूर, पुणे, नांदेड आणि नाशिकसह महाराष्ट्रातील कनेक्शन समोर आले आहे. पेपर ५ ते १५ लाखांमध्ये विकल्याचे आरोप आहेत. परीक्षा रद्द झाल्याने २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेले. या अनिश्चिततेमुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये गंभीर मानसिक तणाव निर्माण झाला. काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विद्यार्थी संघटनांनी एनटीए आणि केंद्र सरकारच्या परीक्षा पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पेपर फुटी रोखण्यात अपयश आल्याने ‘शिक्षण माफिया’ला प्रोत्साहन मिळत असल्याची टीका होत आहे. अमित ठाकरेंनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, या प्रकरणात महाराष्ट्र सरकारनेही सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन केले आहे. सीबीआयचा तपास सुरू असून, आणखी अटक आणि खुलासे होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts