Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • भारताची लोकशाही जगासाठी एक उदाहरण”; संविधान दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रपती मुर्मूंचं प्रतिपादन
Top News

भारताची लोकशाही जगासाठी एक उदाहरण”; संविधान दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रपती मुर्मूंचं प्रतिपादन

Website 3 8

आज संविधान दिन आहे, जो दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. 1949 मध्ये या दिवशी भारतानं आपलं संविधान स्वीकारलं. जुन्या संसद भवनाच्या ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये आयोजित या विशेष समारंभाचं नेतृत्व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. आपल्या भाषणादरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा देत म्हटलं की, भारताची लोकशाही जगासाठी एक उदाहरण आहे. भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.

9 भाषांमध्ये संविधानाचं भाषांतर

याप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मल्याळम, मराठी, नेपाळी, पंजाबी, बोडो, काश्मिरी, तेलुगू, ओडिया आणि आसामी यासह 9 भाषांमध्ये संविधानाच्या अनुवादित आवृत्त्यांचं प्रकाशन केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, “संविधान दिनाच्या ऐतिहासिक प्रसंगी तुम्हा सर्वांमध्ये उपस्थित राहून मला आनंद होत आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी, संविधान भवनाच्या याच मध्यवर्ती सभागृहात, संविधान सभेच्या सदस्यांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्याचे काम पूर्ण केलं. त्याच वर्षी याच दिवशी, आपण, भारतीय लोकांनी, आपलं संविधान स्वीकारलं. स्वातंत्र्यानंतर, संविधान सभेनं भारताची अंतरिम संसद म्हणूनही काम केलं. मसुदा समितीचे अध्यक्ष बाबा साहेब डॉ. भीमराव आंबेडकर हे आपल्या संविधानाचे प्रमुख शिल्पकार होते.”

भारत एक आहे आणि नेहमीच एक राहील

या कार्यक्रमादरम्यान आपल्या भाषणात, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, “आपलं संविधान भारतमातेच्या महान नेत्यांनी संविधान सभेत तयार केलं, त्यावर चर्चा केली आणि ते स्वीकारलं. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या लाखो देशवासीयांच्या सामूहिक ज्ञान, त्याग आणि स्वप्नांचं ते प्रतीक आहे. महान विद्वान, मसुदा समितीचे सदस्य आणि संविधान सभेनं लाखो भारतीयांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सखोल अंतर्दृष्टी प्रदान केली. त्यांच्या निःस्वार्थ योगदानामुळं आज भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश बनला आहे. आपलं संविधान ज्ञान आणि अनुभव, त्याग, आशा आणि आकांक्षा यांनी घडवलं आहे. आपल्या संविधानाच्या आत्म्याने हे सिद्ध केले आहे की भारत एक आहे आणि नेहमीच एक राहील.”

समारंभाला सर्व मान्यवरांची उपस्थिती

या राष्ट्रीय समारंभाला देशातील सर्वोच्च संवैधानिक पदांवर असलेल्या मान्यवरांनी उपस्थिती लावली. राष्ट्रपती मुर्मू, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन यांच्या व्यतिरिक्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री आणि संसद सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts