Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • गुवाहाटी कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव; 408 धावांनी आफ्रिकेनं टीम इंडियाला हरवत जिंकली मालिका
क्रीडा

गुवाहाटी कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव; 408 धावांनी आफ्रिकेनं टीम इंडियाला हरवत जिंकली मालिका

Website 4 9

भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील दुसरा कसोटी सामना गुवाहाटी इथं संपला. संपूर्ण सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं वर्चस्व राहिलं. भारतासमोर या सामन्यात 549 धावांचं महाकाय लक्ष्य होतं आणि त्याचा पाठलाग करणं अत्यंत कठीण होतं. चाहत्यांना आशा होती की टीम इंडिया शेवटच्या दिवशी फलंदाजी करण्यात यशस्वी होईल आणि सामना अनिर्णित राहील. मात्र, भारतीय संघ फक्त 63.5 षटकांतच सर्वबाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेनं 408 धावांनी सामना जिंकला. त्यांनी टीम इंडियाला 2-0 असा धुव्वा उडवत मालिका जिंकली. विशेष म्हणजे टीम इंडियाच्या 93 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात हा धावांच्या बाबतीत सर्वात मोठा पराभव आहे.

सायमन हार्मरच्या 9 विकेट

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या संघानं पहिल्या डावात 489 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात 260/5 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर भारतासमोर 549 धावांचं मोठं लक्ष्य होतं. भारतीय संघ दबावाखाली कोसळला, पहिल्या डावात फक्त 201 धावा आणि दुसऱ्या डावात 140 धावाच करु शकला. आफ्रिकन गोलंदाजांनी दोन्ही डावात भारतीय फलंदाजांना स्थिरावू दिलं नाही. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेकडून सायमन हार्मरनं 6 बळी घेतले आणि सामन्यात त्याच्या बळींची संख्या 9 झाली.

25 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती

या सामन्यात विजय मिळवत टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघानं एक अनोखा पराक्रम केला. दक्षिण आफ्रिकेनं यापूर्वी फक्त एकदाच भारतात कसोटी मालिका जिंकली होती. हा पराक्रम 25 वर्षांपूर्वी 2000 मध्ये हॅन्सी क्रोनिएच्या नेतृत्वाखाली घडला होता. त्यावेळी आफ्रिकन संघानं दोन सामन्यांच्या मालिकेत भारताचा 2-0 असा पराभव केला होता. आता, बावुमानं इतिहासाची पुनरावृत्ती करत दुसरी कसोटी जिंकली आणि मालिकाही जिंकली यासह तो क्रोन्येनंतर भारतात कसोटी मालिका जिंकणारा दुसरा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बनला आहे.

आफ्रिकन संघाचा 10वा कसोटी मालिका विजय

आतापर्यंत भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये 16 कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेनं यापैकी नऊ जिंकल्या होत्या, तर भारतानं चार जिंकल्या आहेत, ज्यामध्ये चार मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. सध्याची मालिका 17वी होती आणि ही मालिका जिंकून, आफ्रिकन संघानं भारताविरुद्धची 10वी कसोटी मालिका जिंकण्याच्या पराक्रम केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts