Marathwada soybean crop : मराठवाड्यात यंदा पाऊस कधी दिलासा देतोय. तर कधी शेतकऱ्यांची चिंता वाढवतोय. जूनमध्ये पावसाने ओढ दिली, जुलैमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावत काहीशी तूट भरून काढली, मात्र ऑगस्टमध्ये पुन्हा पावसाने पाठ फिरवल्याने आता खरीप पिके संकटात आली आहेत.याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आता सरकारकडे मदत नको,कृत्रिम पाऊस पाडा, अशी मागणी केली आहे.रोज आभाळ भरून येतंय, ढग दाटून येतात.पावसाची आशा निर्माण होते.मात्र ढग निघून जातात आणि शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच येते. मराठवाड्यातील काही भागात 15 ते 20 दिवसापासून पावसाचा खंड आहे तर धाराशिव जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीनची अवस्था बिकट झाली आहे.
ऑगस्टमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिके संकटात ( Marathwada soybean crop )
मराठवाड्यातील पावसाची आकडेवारीही याच चिंतेला दुजोरा देते. १ जून ते १८ ऑगस्टदरम्यान मराठवाड्यात सरासरी ४३२.४ मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात ३६३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. म्हणजेच आतापर्यंत सरासरीच्या ८४ टक्के पाऊस झाला आहे. मात्र महिनानिहाय पावसाचा लहरीपणा पाहिला तर परिस्थिती अधिक स्पष्ट होते. जूनमध्ये सरासरीच्या ८४.३ टक्के पाऊस झाला. त्यानंतर जुलैमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावत सरासरीच्या ११४.६ टक्के पाऊस दिला. त्यामुळे जूनची तूट काही प्रमाणात भरून निघाली आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. पण ऑगस्टमध्ये पुन्हा पावसाने पाठ फिरवली. ऑगस्टमध्ये आतापर्यंत सरासरीच्या केवळ ३२.६ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जुलैमध्ये मिळालेला दिलासा आता पावसाच्या खंडामुळे कमी झाला आहे.
सध्या खरीप पिके वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी पिकांना पाण्याची गरज असताना पाऊस नसल्याने जमिनीतील ओलावा कमी होऊ लागला आहे. पुढच्या काही दिवसांत चांगला आणि सर्वदूर पाऊस झाला नाही, तर पिकांना पाण्याचा ताण बसण्याची शक्यता आहे. यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी चांगलाच कसोटीचा ठरत असून, आता सगळ्यांच्या नजरा पुढील पावसाकडे लागल्या आहेत.
हेही वाचा : काकाचा जीव घेतला, मृतदेह लपवला अन् स्वतःच पोलिसांसमोर पोहोचला; मुंबईत धक्कादायक प्रकार
पाऊस, बाजारभाव आणि शेतीच्या संकटाने शेतकरी पुन्हा चिंतेत ( Marathwada farmers )
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही तालुके आणि महसूल मंडळांच्या नोंदींमध्ये अतिवृष्टी झाल्याचे चित्र दिसत असले, तरी प्रत्यक्षात हा पाऊस सर्वदूर आणि विस्तृत स्वरूपात झालेला नसल्याने शेतीसमोरील संकट कायम आहे. काही ठिकाणी कमी वेळेत जोरदार पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली, तर त्याच तालुक्यातील अनेक गावांमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने पिकांना पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. मराठवाड्यासारख्या भागात जिथे पावसाचा खंड पडतो अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी मृत सरी पद्धतीचा अवलंब करावा, जेणेकरून जमिनीत ओलावा निर्माण राहून पीक नुकसान टाळता येते असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक दीपक गवळी यांनी केला आहे…..
कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी, तर पडलेला बाजारभाव, तर कधी शासन आणि दलालांकडून होणारी पिळवणूक, हे सगळं जणू शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलंय, त्यात आता यंदा उगवती केलेली पिकं, जरा भार हलका करतील वाटलं होतं, पुन्हा पावसानं चिंता वाढवलीय…









