Vidhan Parishad Election 2026: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या १७ रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीचा यावर कोणताही अडसर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमधील विधान परिषदेच्या १७ जागांवर निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असल्या तरी त्याचा या निवडणुकीवर परिणाम होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; ९३.७०% उत्तीर्ण, ५५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९५% पेक्षा जास्त गुण
या मतदारसंघांमध्ये महापालिका, नगरपालिकांचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समित्यांचे सभापती हे मतदार असतात. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर न झाल्यामुळे अनेक जागांवर मागील आमदारांचा कार्यकाळ संपूनही निवडणुका रखडल्या होत्या. त्यामुळे काही जागा गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून रिक्त आहेत.
एक-दोन दिवसांत अहवाल सादर
मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या कार्यालयाकडून या १७ मतदारसंघांबाबतचा अहवाल एक-दोन दिवसांत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
या मतदारसंघांचा समावेश
या मतदारसंघांमध्ये सोलापूर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, नांदेड, यवतमाळ, जळगाव, अहिल्यानगर, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना, सांगली-सातारा आणि भंडारा-गोंदिया यांचा समावेश आहे.
नऊ जागांसाठी
दरम्यान, विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या आणखी नऊ जागांसाठीही लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. संख्याबळानुसार या जागांचे पक्षनिहाय वाटप निश्चित होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.












