Maharashtra Tourism Department Launches Women Loan Scheme: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे पर्यटन विभागाची ‘आई’ योजना. या योजनेअंतर्गत महिलांना पर्यटन क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्यासाठी तब्बल १५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाते.
आज अनेक महिला स्वतःचा उद्योग सुरू करण्याचे स्वप्न पाहतात, मात्र आर्थिक अडचणींमुळे त्यांना पुढे जाता येत नाही. अशा महिलांसाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे. पर्यटनाशी संबंधित व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. विशेष म्हणजे हे कर्ज विनातारण असून त्यावर कोणतेही व्याज आकारले जात नाही.
या योजनेत पर्यटन क्षेत्राशी निगडित सुमारे ४१ प्रकारच्या व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे. होमस्टे, लॉजिंग, रिसॉर्ट, ट्रॅव्हल एजन्सी, स्थानिक खाद्यपदार्थ केंद्र, हस्तकला व्यवसाय, पर्यटन मार्गदर्शन सेवा अशा अनेक उद्योगांसाठी महिलांना कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
कर्ज परतफेडीसाठी महिलांना ७ वर्षांचा कालावधी दिला जातो. वेळेत कर्जाची परतफेड केल्यास व्याजाची रक्कम सरकारकडून भरली जाते. त्यामुळे महिलांवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होते.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
रहिवासी पुरावा
बँक पासबुक
व्यवसायाचा सविस्तर आराखडा
व्यवसाय नोंदणीसंबंधी कागदपत्रे
जर अर्जदार महिलेकडे व्यवसायाची स्पष्ट योजना आणि आवश्यक कागदपत्रे असतील तर कर्ज मंजुरीची प्रक्रिया अधिक सोपी होते.
अर्ज कुठे करावा?
महिला अर्जदार महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या maharashtratourism.gov.in अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच संबंधित पर्यटन विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधूनही अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येते.
ही योजना महिलांना स्वावलंबी बनवण्यासोबतच राज्यातील पर्यटन व्यवसायालाही चालना देणारी ठरत आहे. त्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.












