Pune CNG PNG Price Hike : १३ नोव्हेंबरपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये CNG आणि PNG महागले. CNG चा नवा दर, PNG ची किंमत आणि दरवाढीचे कारण जाणून घ्या.
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या खर्चातून दिलासा मिळावा म्हणून सीएनजीचा पर्याय निवडणाऱ्या वाहनधारकांना आता दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. पुणे शहर आणि परिसरात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) आणि पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) यांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १ रुपये २५ पैशांची, तर घरगुती पीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ झाली आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. (Pune PNG-CNG Price)
पुण्यात CNG आणि PNG चे नवे दर किती?
या दरवाढीचा परिणाम प्रामुख्याने पुणे शहर आणि परिसरातील ग्राहकांवर होणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण आणि हिंजवडी परिसरात सीएनजीचा नवा दर प्रतिकिलो ९९ रुपये झाला आहे. तर घरगुती पीएनजीचा दर प्रति युनिट ५३ रुपये इतका झाला आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या दरात झालेली ही वाढ वाहनधारकांसह घरगुती ग्राहकांच्या खर्चात भर घालणारी ठरणार आहे. विशेषतः दररोज प्रवासासाठी सीएनजीवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना आता इंधनासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. (Price Hike in Pune)
रिक्षा आणि कॅबचालकांच्या खर्चात वाढ होणार?
पुणे शहरात रिक्षा, कॅब आणि खासगी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यातील अनेक वाहने सीएनजीवर चालतात. त्यामुळे इंधनाच्या दरात वाढ झाल्याने वाहनचालकांच्या दैनंदिन खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. आधीच वाहन देखभाल, इंधन आणि इतर खर्चाचा ताळमेळ साधताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. त्यात आता सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने त्यांच्या आर्थिक गणितावर परिणाम होऊ शकतो. (MNGL New Rates)
वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी काही वाहनचालक प्रवासभाड्यात वाढ करण्याचा विचार करू शकतात. मात्र, याबाबत कोणताही अधिकृत निर्णय झाल्याची माहिती नाही. केवळ वाहनधारकांनाच नव्हे, तर घरगुती गॅस वापरणाऱ्या कुटुंबांनाही या दरवाढीचा फटका बसणार आहे. पीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ झाल्यामुळे स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसचा मासिक खर्च वाढणार आहे. आधीच अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खर्चाचे नियोजन करणाऱ्या कुटुंबांच्या बजेटवर याचा अतिरिक्त भार पडू शकतो. (Maharashtra Gas Price)
नाशिक आणि धुळ्यातही CNG महागले
दरम्यान, पुण्याबरोबरच नाशिक आणि धुळे जिल्ह्यातही सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १ रुपये २५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या भागांतील ग्राहकांना आता सीएनजीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. नाशिक आणि धुळे जिल्ह्यात सीएनजीचा नवा दर प्रतिकिलो ९९ रुपये ७५ पैसे झाला आहे. या दरवाढीची अधिकृत माहिती महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) कडून देण्यात आली आहे. त्यामुळे सीएनजी आणि पीएनजी वापरणाऱ्या ग्राहकांच्या मासिक खर्चात किती वाढ होते, याकडे आता लक्ष लागले आहे. (CNG PNG Price Today)









