Mankhurd Building Collapse: गेली आठ दिवसापासून मुसळधार पावसाने अनेकांची झोप उडाली आहे. मुंबईतील मानखुर्दमध्ये रविवारी रात्री मोठी दुर्घड घडल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतील मानखुर्द परिसरात (Mankhurd Building Collapse) रविवारी रात्री ९ च्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. जनता नगर परिसरातील तीन मजली चाळीचा एक भाग अचानक कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अनेक रहिवासी अडकले. या दुर्घटनेत पाच लहान मुलांसह एका महिलेचा मृत्यू झाला असून एक जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित इमारत धोकादायक स्थितीत असल्याने काही कुटूंबे घरातील सामान बाहेर काढण्याची तयारी करत होती. त्याचदरम्यान इमारतीचा काही भाग अचानक कोसळला आणि अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. त्यानंतर अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), पोलीस, महानगरपालिका कर्मचारी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.
हेही वाचा: मुसळधार पावसाचा फटका; मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक परिसरात स्लॅब कोसळला
पाच लहान मुले आणि एका महिलेला मृत
बचाव पथकांनी ढिगारा हटवून अडकलेल्यांना बाहेर काढले आणि उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयांत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी पाच लहान मुले आणि एका महिलेला मृत घोषित केले. जखमी व्यक्तीवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
महापौर रितू तावडे यांनी रुग्णालयात जाऊन मृतांच्या नातेवाईकांची भेट
दुर्घटनेनंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे ( Ritu Tawade) यांनी रुग्णालयात जाऊन मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली आणि प्रशासनाकडून आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनीही घटनास्थळी पाहणी करून बचावकार्याचा आढावा घेतला.
दुर्घटनेची सखोल चौकशी केली जाणार
मंत्री महाजन (Mahajan) यांनी सांगितले की, दुर्घटनेची सखोल चौकशी केली जाईल. परिसरातील धोकादायक आणि जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात येणार आहेत. तसेच शासनाच्या नियमानुसार मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया राबवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जुन्या आणि धोकादायक इमारतींबाबत सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे. अशा इमारतींमध्ये राहणाऱ्यांनी कोणताही धोका जाणवल्यास तातडीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे.












