Dharashiv Politics: ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. धाराशिवच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, सहा नगरसेवक शिंदेसेनेत दाखल झाल्याने स्थानिक राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.
धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. धाराशिव (Dharashiv) नगरपालिकेतील सहा नगरसेवकांनी एकनाथ शिंदे (Shinde Sena) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे शहरातील शिवसेनेच्या संघटनेला बळ मिळाल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या सहा नगरसेवकांचा शिवसेनेत (Six Dharashiv Councillors Join Shinde-Led Shiv Sena) प्रवेश झाला. यावेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्षात आलेल्या नव्या सहकाऱ्यांचं स्वागत करत त्यांनी पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा: ब्रेकअपने उघड केली MPSC पेपरफुटी? औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट
कोणते नगरसेवक शिवसेनेत दाखल?
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत धाराशिव नगरपालिकेचे नगरसेवक प्रदीप मुंडे, संतोष उर्फ नाना घाडगे, सोनाली अमित उंबरे, केसरबाई, ज्ञानदेव करवर, अमित उंबरे आणि ज्ञानदेव करवर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे धाराशिव शहरातील शिवसेनेची राजकीय ताकद वाढण्याची शक्यता आहे. ( LS Marathi News Channel )
ओमराजे निंबाळकरांकडून नव्या सहकाऱ्यांचं स्वागत
या पक्षप्रवेशानंतर ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नव्या सहकाऱ्यांचं स्वागत (Omraje Nimbalkar Welcomes New Party Members) केलं. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचं त्यांनी म्हटलं.
जनसेवा, विकास आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी काम करत धाराशिव शहरातील शिवसेनेची संघटना आणखी मजबूत करण्यासाठी या नव्या सहकाऱ्यांचा मोठा हातभार लागेल, असा विश्वास निंबाळकर यांनी व्यक्त केला.
धाराशिवच्या राजकारणात नवी समीकरणं?
सहा नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळे धाराशिवच्या स्थानिक राजकारणात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः ठाकरे गटासाठी हा धक्का मानला जात आहे, तर शिंदे गटासाठी हा पक्षसंघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रवेश ठरू शकतो.
या पक्षप्रवेशावेळी सूरज साळुंके, सोमनाथ गुरव, ऋषिकेश भैय्या मगर आणि सह्याद्री राजेनिंबाळकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सहा नगरसेवकांच्या प्रवेशामुळे नेमकं काय बदलणार?
धाराशिव नगरपालिकेतील या सहा नगरसेवकांच्या प्रवेशामुळे आगामी काळात शहरातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर शिवसेनेची संघटना किती मजबूत होते आणि या नव्या प्रवेशाचा आगामी राजकारणावर काय परिणाम होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.









