Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • ठाकरेंचा बालेकिल्ला खालसा! संजय जाधवांचे ठरले, शिंदेसेना कि भाजप कुठं जाणार?
Top News

ठाकरेंचा बालेकिल्ला खालसा! संजय जाधवांचे ठरले, शिंदेसेना कि भाजप कुठं जाणार?

Sanjay Jadhav BJP or Shinde Sena

Sanjay Jadhav BJP or Shinde Sena : राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politics) आता सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून परभणीचे खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) हे शिवसेना शिंदे गट किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठत होत्या. मात्र, आता हे प्रकरण केवळ वावड्यांपुरते मर्यादित राहिले नसून समर्थकांच्या कृतीतून ते उघडपणे समोर येत आहे. त्यामुळे ठाकरेच्या शिवसेनेचा (Thackeray Shiv Sen) बालेकिल्ला मानला जाणार परभणी जिल्हा (Parbhani District Politics) आता ठाकरे मुक्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संजय जाधव हे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray)  शिवसेनेतील एक अत्यंत आक्रमक आणि निष्ठावान चेहरा म्हणून ओळखले जात होते. मात्र, गेल्या काही दिवसांतील घडामोडींनी या निष्ठेला तडा गेल्याचे स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, या वादाची ठिणगी तेव्हा पडली जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांचे अत्यंत खंदे समर्थक आणि जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांची जिल्हाप्रमुख पदावरून तडकाफडकी उचलबांगडी केली. आणेराव यांच्या जागी नवीन जिल्हाप्रमुखाची नियुक्ती करणे, हे संजय जाधव यांना शह देण्याचे राजकारण असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. गंगाप्रसाद आणेराव यांच्या हकालपट्टीनंतर परभणीतील शिवसेनेचे राजकारण अक्षरशः ढवळून निघाले.

हेही वाचा – PM मोदीनंतर CM फडणवीस यांचे जनतेला इंधन आणि खाद्यतेल वाचवण्याचे आवाहन

८२ शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे

आणेराव यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ आणि खासदार संजय जाधव यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी परभणी जिल्ह्यातील तब्बल ८२ शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि स्थानिक शाखाप्रमुखांचा समावेश आहे. केवळ परभणी शहरच नव्हे, तर पाथरी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख आणि तेथील पदाधिकाऱ्यांनीही एक बैठक घेऊन जाहीर केले आहे की, पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय त्यांना मान्य नाही आणि ते सर्वशक्तीनिशी खासदार संजय जाधव यांच्या पाठीशी उभे आहेत.

 बॅनरवरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो गायब

या सर्व घडामोडींनंतर आता खासदार संजय जाधव यांचे पक्षांतर केवळ तांत्रिकदृष्ट्या शिल्लक असल्याचे दिसते. परभणीच्या बसस्थानकावरील तो डिजिटल बॅनर हा त्यांच्या समर्थकांनी दिलेला एक ‘अल्टिमेटम’ मानला जात आहे. या बॅनरवर संजय जाधव यांचे मोठे छायाचित्र असून त्यासोबत केवळ स्थानिक समर्थकांचे फोटो आहेत. “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो का नाहीत?” या प्रश्नावर समर्थकांनी दिलेली मौन प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते.

संजय जाधव यांच्यासमोर दोन पर्याय खुले

आता प्रश्न उरतो तो म्हणजे, संजय जाधव नक्की कोठे जाणार? राजकीय विश्लेषकांच्या मते त्यांच्यासमोर दोन प्रमुख पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना. गेल्या अनेक दिवसांपासून जाधव हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या बातम्या येत आहेत. दुसरे म्हणजे, भारतीय जनता पक्ष. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी अनेकदा जाधवांचे कौतुक केले असून, त्यांना भाजपमध्ये येण्याचे उघड आमंत्रणही दिले आहे.

शिवसेना उबाठा गटासाठी मराठवाड्यात मोठा धक्का

संजय जाधव यांचे हे पाऊल शिवसेना उबाठा गटासाठी मराठवाड्यात मोठा धक्का ठरू शकते. परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो आणि संजय जाधव यांनी हा गड अनेक निवडणुकांपासून राखला आहे. मात्र, पक्ष नेतृत्वाशी झालेला संघर्ष आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची नाराजी यामुळे आता ते अधिक काळ उद्धव ठाकरेंसोबत राहण्याची शक्यता मावळली आहे. आता केवळ औपचारिकता बाकी असून, संजय जाधव कधी आणि कोणत्या मुहूर्तावर आपला नवीन राजकीय प्रवास सुरू करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

‘ऑपरेशन टायगर’ या शब्दाची मोठी चर्चा सुरू

परभणीतील हे ‘बॅनर नाट्य’ येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते नवे वळण घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मात्र, सध्या तरी परभणीच्या राजकारणात ‘ठाकरे’ ब्रँड मागे पडून ‘संजय जाधव’ हा स्वतःचा स्वतंत्र मार्ग निवडण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ या शब्दाची मोठी चर्चा सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून एकेक करून बडे नेते आणि खासदार बाहेर पडत असल्याने ठाकरेंची शिवसेना मोठ्या संकटात सापडली आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडांनंतरही पक्षातील गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये, उलट आता निवडणुकीच्या तोंडावर उरलेले ‘वाघ’ही दुसऱ्या गोटात जाण्याच्या तयारीत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

केवळ नाराजी नसून पक्षांतराची स्पष्ट नांदी

परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरवरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो गायब झाल्याने, ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत आणखी एक मोठा मोहरा गळाला लागल्याचे मानले जात आहे. संजय जाधव हे मराठवाड्यातील शिवसेनेचा मोठा चेहरा आहेत. त्यांच्यासारख्या आक्रमक नेत्याने पक्षप्रमुखांचे फोटो टाळणे, हे केवळ नाराजी नसून पक्षांतराची स्पष्ट नांदी आहे.गेल्या काही काळात अमोल कीर्तिकर आणि आता संजय जाधव यांच्यासारख्या नेत्यांच्या भूमिका संशयास्पद किंवा बंडाच्या पवित्र्यात राहिल्या आहेत. सत्ताधारी महायुतीकडून शिंदे गट आणि भाजप जाणीवपूर्वक ठाकरेंच्या शिवसेनेतील मातब्बर नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्यालाच राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ असे संबोधले जात आहे.

उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर स्थानिक नेत्यांची नाराजी

या गळतीमागे प्रामुख्याने दोन कारणे दिली जात आहेत. पहिले म्हणजे, उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या सभोवतालच्या चौकडीवर स्थानिक नेत्यांची असलेली नाराजी. दुसरे म्हणजे, आगामी निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे मिळणारे पाठबळ. परभणीत ८२ पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी दिलेले राजीनामे ही केवळ स्थानिक नाराजी नसून, पक्ष नेतृत्वाच्या विश्वासार्हतेवर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह आहे.’ऑपरेशन टायगर’चा हा झंझावात रोखण्यासाठी मातोश्रीवरून कोणते प्रयत्न होतात की उरलेली शिवसेनाही अशीच विखुरली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या वाढत्या गळतीनंतर उद्धव ठाकरे आता नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी देऊन पक्षाची पुनर्बांधणी करू शकतील का, की ही पडझड थांबवणे अशक्य होईल? असाही एक सवाल उपस्थित होतोय.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts