Murlidhar Mohol attack on Ajit Pawar : केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्यातील भाजपा नेते मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर थेट आणि आक्रमक शब्दांत टीका केली आहे. अजित पवार यांनी गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
एकीकडे कोयता गँग संपवा, गुन्हेगारी संपवा अशी भाषणं करायची आणि प्रत्यक्षात उमेदवारी मात्र वादग्रस्त लोकांना द्यायची हा दुटप्पीपणा पुणेकर पाहत आहेत, असा जोरदार हल्लाबोल मोहोळ यांनी केला. गुन्हेगारी संपवण्याची जबाबदारी राजकारण्यांची असते. केवळ घोषणा नव्हे तर कृती महत्त्वाची असते. शेवटी पुणेकरच याला योग्य उत्तर देतील,असेही ते म्हणले. अवघ्या एका नगरसेवकाच्या जीवावर शिवसेना तब्बल १६५ जागा लढवायला निघाली होती,” असा टोला त्यांनी लगावला.
हे ही वाचा : 2026 मध्ये ‘या’ 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार; त्या राज्यात सध्या कोणाचं आहे सरकार?
युतीवर स्पष्ट भूमिका
भाजपाची आजही युती करण्याची इच्छा आहे. पुण्यात आम्ही ९२ महिलांना उमेदवारी दिली आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी युतीबाबत जो निर्णय घ्यावा, तो आम्हाला मान्य असेल. त्यांच्या निर्णयानंतर ज्या ठिकाणी माघार घ्यायची असेल, त्या उमेदवारांचे AB फॉर्म माघारी घेतले जातील अशी स्पष्ट भूमिका मोहोळ यांनी मांडली. या पत्रकार परिषदेला शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि संदीप खर्डेकर उपस्थित होते.
अमोल बालवडकर यांचे टीकास्त्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल बालवडकर यांनी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. अजित पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यांवरून बालवडकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. “गुन्हेगारांना विदेशात पळून जाण्यास मदत करणाऱ्यांचा ‘आका’ बाजूला घेऊन बसणारे आणि केवळ मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आलेले सुसंस्कृत पुणे शहराचे खासदार आमचे नेते अजित दादा पवार यांना राजकारण शिकवू नयेत,” असे बालवडकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “तुमच्या काठावर निवडून येण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही वाटा आहे, हे विसरू नका. ‘गरज सरो वैद्य मरो’ ही तुमची नेहमीची भूमिका योग्य नाही. यापुढे अजित दादांवर बोलाल तर जसाच तसे उत्तर दिले जाईल. या वक्तव्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.












