Rupali Chakankar ED Inquiry: रुपाली चाकणकर यांची मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित चौकशीच्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) तब्बल ८ तास सविस्तर चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्या ईडी कार्यालयातून बाहेर पडताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चाना उधाण आले आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात आली. मुंबईतील ईडी कार्यालयात त्यांची अनेक तास चौकशी झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध आरोपांवर स्पष्टीकरण दिले.
हेही वाचा: महिलांमध्ये PCOS का वाढतोय? जाणून घ्या सुरुवातीची ही लक्षणे, कारणे आणि उपाय
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आर्थिक व्यवहार आणि जवळीक यासंदर्भात तपास सुरू असून, त्याच पार्श्वभूमीवर ईडीने चाकणकर यांना चौकशीसाठी बोलावले होते. सकाळी ईडी कार्यालयात दाखल झाल्यानंतर त्यांची सविस्तर चौकशी करण्यात आली.
चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, तपास यंत्रणेकडून सहकार्याची अपेक्षा असल्याने त्या चौकशीसाठी हजर राहिल्या. काही माध्यमांमध्ये चुकीच्या पद्धतीने बातम्या सादर केल्या गेल्याचा आरोपही त्यांनी केला.
“माझा कोणताही संबंध नाही”
अशोक खरात प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे चाकणकर यांनी स्पष्ट केले. “मी माझा जबाब नोंदवला असून तपासात पूर्ण सहकार्य करणार आहे. तपासातून लवकरच सत्य बाहेर येईल,” असे त्यांनी सांगितले.
तसेच, बनावट खात्यांबाबत आणि आर्थिक व्यवहारांबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. काही संस्थांशी आपल्या कुटुंबाचा संबंध नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
गुवाहाटी दौऱ्यावरही दिले उत्तर
अशोक खरातसोबतच्या गुवाहाटी दौऱ्याबाबत विचारण्यात आल्यानंतर चाकणकर म्हणाल्या की, त्या स्वतंत्रपणे आपल्या कुटुंबासह दर्शनासाठी गेल्या होत्या. “अनेक लोकांची अशोक खरातवर श्रद्धा होती, आमचीही होती. मात्र नंतर संबंधित प्रकरण समोर आले,” असे त्यांनी स्पष्ट केले.










