Maharashtra Rain | एकिकडे संपूर्ण देशभरात कडक उन्हाचा (Summer) तडाखा जाणवत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात पावसानं (Maharashtra Rain) धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातील सांगली (Sangli) जिल्ह्यात पावसानं रौद्ररूप धारण केलं होतं. सांगलीत जोरदार पाऊस आणि वादळामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. पावसानं कहर केल्याने आणि जोरदार वादळी वाऱ्यामुळे सांगलीतील एका मंदिराची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा – UP हादरली! निवडणुकीपुर्वीच अखिलेश यादवांच्या सख्या भावाचा संशयास्पद मृत्यू
सांगलीत नेमकं घडलं काय?
सांगलीतील मोटवाडी गावातील मार्गुदेवी मंदिरात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठी दुर्घटना घडली. पावसामुळे मार्गुदेवी मंदिराची भिंत कोसळल्याने मंदिर परिसरात गोंधळ उडाला होता. तसेच या दुर्घटनेत अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आणि सर्वत्र वेदनादायी किंकाळ्या घुमत होत्या. या घटनेची माहिती मिळताच तेथील स्थानिक रहिवासी आणि प्रशासनाच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 12 हून अधिक व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सांगली जिल्ह्यातील जठ तालुक्यात मोटवाडी गावातील मार्गुदेवी मंदिरात घडली. पावासामुळे मंदिर परिसराची एक भिंत आणि पत्र्याचे छत कोसळले आहे. तर मंगळवार असल्यामुळे या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. अपघाताच्या वेळी मंदिर परिसरात सुमारे 350 भाविक उपस्थित होते. तर सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस अचानक सुरू झाल्याने भाविकांना भिंतीमागे आणि पत्र्याखाली आश्रय घ्यावा लागला. मात्र, भिंत आणि पत्रे अचानक कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आणि काही भाविक ढिगाऱ्याखाली गाडले गेले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.












