Himanta Biswa Sarma | आसामध्ये (Assam) भारतीय जनता पार्टी (BJP) आणि एनडीएची (NDA) सत्ता कायम राहिली आहे. कारण आसाम विधानसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीए आघाडीचा मोठा विजय झाला आहे. या निवडणुकीत विजय झाल्यानंतर हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) हे दुसऱ्यांचा आसामचे मुख्यमंत्री (Assam CM) बनले आहेत. आज (12 मे) हिमंता बिस्वा सरमा यांनी दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
हेही वाचा – आता दारूची दुकाने बंद होणार; मुख्यमंत्री बनताच थलपथी विजय अॅक्शन मोडमध्ये, दिले कठोर आदेश
हिमंता बिस्वा सरमा हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान
हिमंता बिस्वा सरमा हे आज दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. तसेत हिमंता बिस्वा सरमा यांच्यासोबत चार मंत्र्यांनी देखील शपथ घेतली आहे. आज सकाळी 11:45 वाजता राज्याचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी हिमंता सरमा आणि नवीन मंत्रिमंडळाच्या सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
हिमंता बिस्वा सरमा यांच्यासोबत शपथ घेणाऱ्या 4 नेत्यांमध्ये भाजप आमदार अजंता नेओग, भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली, आसाम गण परिषद अध्यक्ष अतुल बोरा आणि बोडोलँड पीपल्स फ्रंटचे नेते चरण बोरो यांचा समावेश आहे. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते रणजित दास हे आसाम विधानसभेचे नवे अध्यक्ष असणार आहेत.
आसाम विधानसभा निवडणुकीत एनडीएने उत्कृष्ट कामगिरी करत 102 जागा जिंकल्या ज्यात एकट्या भाजपने 82 जागा जिंकल्या आहेत. तर एनडीएच्या या मोठ्या विजयानंतर, आज हिमंता बिस्वा सरमा यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तसेच पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
हिमंता बिस्वा सरमा यांची राजकीय कारकिर्द
हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस पक्षातून राजकारणात प्रवेश केला होता. ते 2001 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले होते, तर 2002 मध्ये मंत्री झाले होते. नंतर 2015 मध्ये त्यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर त्यांनी जालुकबारीमधून सलग सहाव्यांदा निवडणूक जिंकली. काँग्रेसच्या बिदिशा नियोग यांचा त्यांनी 89434 मतांनी पराभव केला होता. हिमंता सरमा हे 10 मे 2021 रोजी पहिल्यांदा आसामचे मुख्यमंत्री झाले होते. त्यांची संपूर्ण ईशान्य भारतात भाजपच्या विजयात मोठी भूमिका आहे. तसेच आताही यंदाच्या विधानसभा निवडणूकीत भाजप आणि एनडीए आघाडीचा मोठा विजय झाला असून हिमंता सरमा हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.












