Pune Toxic Liquor Case: पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू प्रकरणात पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. फुगेवाडी आणि हडपसर भागात विषारी दारूचे सेवन केल्याने १२ हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. तापसादरम्यान निष्काळजीपणा आणि कर्तव्यपालनात हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवत पुणे शहर पोलिस दलातील तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची गती वाढवत आतापर्यंत आठ संशयितांना अटक केली आहे. सुरुवातीला फुगेवाडी परिसरात आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर हडपसर भागातही आणखी काही मृत्यूंची नोंद झाल्याने मृतांचा आकडा वाढला.
हेही वाचा: जूनमध्ये ट्रिपला जाण्याची तयारी करताय? मग कपड्यांव्यतिरिक्त ‘या’ 5 गोष्टी बॅगमध्ये असायलाच हव्यात
या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, हडपसर चौकीतच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हासिनी शिकलगार आणि गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.
अवैध दारूविरोधात कारवाई न झाल्याचा आरोप
तपासादरम्यान संबंधित भागात अवैध दारू विक्रीबाबत माहिती उपलब्ध असतानाही प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात अपयश आल्याचे निदर्शनास आले. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
या प्रकरणी विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून, विषारी दारूचा पुरवठा आणि विक्री करणाऱ्या साखळीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे पोलिस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने दोषींविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.
राज्यभरात या घटनेची तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी अवैध दारूविरोधातील मोहिमा अधिक तीव्र करण्याची मागणी होत आहे.












