– अमोल धर्माधिकारी, Pune Westin Beuro Head
Pune Police Action: पुण्यातील दोन पंचतारांकित हॉटेल्समध्ये वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांची माहिती पोलिसांना वेळेत न दिल्याने JW Marriott आणि Sheraton Grand विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे शहरातील दोन नामांकित पंचतारांकित हॉटेल्सवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. सेनापती बापट रोडवरील JW Marriott Hotel Pune आणि Sheraton Grand Pune या हॉटेल्सविरोधात विदेशी नागरिकांच्या वास्तव्याची माहिती पोलिसांना वेळेत न दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे शहरात हॉटेल, लॉज किंवा अन्य ठिकाणी विदेशी नागरिक वास्तव्यास आल्यास त्यांची आवश्यक माहिती संबंधित पोलीस यंत्रणेला वेळेत देणे बंधनकारक आहे. मात्र, या दोन्ही हॉटेल्सच्या व्यवस्थापनाकडून विदेशी नागरिकांच्या आगमनाची माहिती निर्धारित वेळेत नोंदवण्यात अली नसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.
हेही वाचा: 5 टक्के क्रीडा आरक्षणाचा गैरफायदा; बनावट प्रमाणपत्रांद्वारे पुणे पोलिस दलात 19 जणांची भरती
विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत अमृतकर यांनी पुणे शहरातील हॉटेल्स, लॉज आणि भाडेकरूंची माहिती पोलिसांकडे नोंदविण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
JW Marriott कडून तब्बल 39 दिवस उशिराने माहिती
सेनापती बापट रोडवरील JW Marriott हॉटेलमध्ये इटलीचे नागरिक क्रिस्टियन हुबेर (Christian Huber) हे 7 जून 2026 रोजी वास्तव्यास आले होते. मात्र, त्यांच्या वास्तव्याची माहिती हॉटेल व्यवस्थापनाने पोलिसांकडे 17 जुलै 2026 रोजी नोंदवली.
पोलिसांच्या माहितीनुसार, या नोंदीसाठी तब्बल 39 दिवस 11 तास म्हणजेच 947 तासांचा विलंब झाला. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाने नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
Sheraton Grand मध्येही माहिती देण्यास विलंब
दरम्यान, Sheraton Grand Pune हॉटेलमध्ये चीनचे नागरिक क्यु लुओ (Qi Luo) हे 14 जून 2026 रोजी सायंकाळी राहण्यासाठी आले होते. त्यांच्या आगमनाची माहिती हॉटेलकडून २८ जून रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास नोंदवण्यात आली. या प्रकरणातही विदेशी नागरिकांच्या राहण्याची माहिती पोलिसांना देण्यास १४ दिवस १ तास म्हणजेच ३३७ तासांचा उशिरा झाल्याचे तपासात समोर आले आहे.
दोन्ही प्रकरणांमध्ये माहिती देण्यास झालेल्या विलंबाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधित हॉटेल व्यवस्थापनाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली चतु:श्रृंगी आणि बंडगार्डन पोलीस या प्रकरणांचा पुढील तपास करत आहेत.









