Donald Trump protest Mahalunge Padwal : इराण–इस्रायल (Iran–Israel War) दरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम भारतातील सर्वसामान्य नागरिकांवर होत असल्याचा आरोप करत, पुणे जिल्ह्यातील आंबेगावच्या महाळुंगे पडवळ (Mahalunge Padwal) येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध आंदोलन (Intense Protest Movement) करण्यात आले.
हेही वाचा – राजकारणात खळबळ! झिरवळांच्या व्हायरल व्हिडीओप्रकरणी पहिला FIR दाखल, थेट कारवाई कुणावर?
हुतात्मा बाबू गेनू चौकात आयोजित या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक, युवक, शेतकरी व कामगार सहभागी झाले होते. यावेळी “डोनाल्ड ट्रम्प मुर्दाबाद” युद्धबंदी झालीच पाहिजे अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिमेला जोडे मारत तीव्र संताप व्यक्त केला व त्यानंतर पुतळ्याचे दहन करण्यात आले.
युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधन दरात मोठी वाढ होत असून, त्याचा थेट परिणाम भारतातील गॅस व पेट्रोलच्या साठ्यावर होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर महागाईचे ओझे वाढले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मालाच्या निर्यातीवरही मोठा परिणाम झाला असून, जेएनपीटी बंदरात हजारो कंटेनर अडकून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
युद्धाची झळ आता सामान्य जनतेपर्यंत पोहोचत असून, हे युद्ध असेच सुरू राहिल्यास महागाईमुळे नागरिक होरपळून निघतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली. यामुळेच या धोरणांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आल्याचे हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री बाबाजी चासकर यांनी सांगितले.












