Sunetra Pawar Threat : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून त्यांच्या जीवाला धोका असल्याचे वृत्त समोर आले. बीडमधील (Beed Police) एका व्यक्तीने पोलीस प्रशासनाकडे एक तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. या तक्रारीत थेट रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या तक्रारीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी याची चौकशी (Police Interrogation) सुरू केली असून प्रशासन प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहे.
चाकणकर यांच्याकडून सुनेत्रा पवारांना धोका?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक दावा एका तक्रारीद्वारे करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा धोका राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडूनच असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. बीडमधील एका व्यक्तीने पोलीस प्रशासनाकडे एक तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत असा दावा करण्यात आला आहे की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असून त्यामागे रूपाली चाकणकर यांचा हात असू शकतो. ही तक्रार समोर आल्यानंतर गृह विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. तक्रारदार व्यक्ती कोण आहे आणि या तक्रारीत नेमके कोणते पुरावे जोडले आहेत, याबाबतची माहिती अद्याप गोपनीय ठेवण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाने या प्रकरणाच्या तपासाची चक्रे वेगाने फिरवायला सुरुवात केली.
राजकीय चारित्र्यहनन बदनामीचा भयंकर डाव – चाकणकर
स्वतःवर झालेल्या या गंभीर आरोपांनंतर रूपाली चाकणकर यांनी आक्रमक भूमिका मांडली. हे सर्व आरोप फेटाळून लावले. या प्रकरणाला राजकीय चारित्र्यहनन बदनामीचा भयंकर डाव असल्याच त्यांनी म्हटलंय. गेल्या २८ दिवसांपासून माझ्या विरुद्ध आणि माझ्या कुटुंबाविरुद्ध षडयंत्र रचले जात आहे. हे आरोप पूर्णपणे बनावट असून याला कोणताही आधार नाही. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर बिनबुडाचे आरोप करून बदनामी केली जात आहे.
पडताळणीशिवाय बातम्या चालवणे त्रासदायक – बीड अधिक्षक
ज्या पत्रावरून ही सर्व चर्चा सुरू आहे, ते पत्र निनावी आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी स्पष्ट केले आहे की, निनावी पत्राला कायदेशीर महत्त्व नसते. मग अशा पत्राची चर्चा माध्यमांमध्ये का घडवून आणली जात आहे? असा सवाल त्यांनी केला. याचीही चौकशी होणे आवश्यक आहे. कोणत्याही पडताळणीशिवाय अशा प्रकारच्या बातम्या चालवणे हे मानसिक त्रास देणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
खरात प्रकरणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कोणताही सहभाग नाही
मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की, आमचा कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा खरात प्रकरणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग नाही. सत्य लवकरच समोर येईल, अस त्यांनी म्हटंलंय. केवळ अनुमानांच्या आधारे रचलेल्या कथा पेरून मला मानसिक त्रास दिला जात आहे. खरात प्रकरण किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी माझा दुरान्वयेही संबंध नाही.
पोलीस खाते सुरक्षेसाठी अत्यंत सक्षम – फडणवीस
या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पूर्ण काळजी घेऊ. महाराष्ट्राचे पोलीस खाते अत्यंत सक्षम आहे आणि यापूर्वीही त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. तक्रारीत जे काही तथ्य असेल त्याची सखोल चौकशी केली जाईल. त्यांना योग्य ती सुरक्षा पुरवण्यात आली आहे. सुनेत्रा वहिनींना योग्य ती सुरक्षा पुरवण्यात आली असून, प्रशासन कोणत्याही धोक्याचा सामना करण्यास सज्ज आहे. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटंलंय.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेत वाढ
सध्या हे संपूर्ण प्रकरण केवळ एका निनावी पत्रावर आधारित असल्याचे दिसत असले, तरी उपमुख्यमंत्री पदाच्या व्यक्तीशी संबंधित हा विषय असल्याने पोलिसांनी यात कोणतीही कसर सोडलेली नाही. रूपाली चाकणकर यांनी हे आरोप खोडून काढले असले, तरी आता तपासात काय निष्पन्न होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.












