Nana Patole On PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल (18 एप्रिल) रात्री देशवासियांना संबोधित केले. महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींनी जनेताला संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणार काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तर त्यांच्या या टीकेला आता काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी वारंवार खोटं बोलतात, असं म्हणत नाना पटोलेंनी त्यांच्यावर खोचक टीका केली आहे.
हेही वाचा – ट्रॉफीसाठी अंतिम लढत! ‘बिग बॉस मराठी 6’ चे टॉप 5 फायनलिस्ट जाहीर, कोण मारणार बाजी?
पंतप्रधान मोदींवर नाना पटोलेंनी काय केली टीका?
नाना पटोले म्हणाले की, मला आजपर्यंत असं वाटत होतं की, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करतात त्यावेळी ते देशहिताच्या मुद्द्यावर बोलतात. मात्र, तसं होत नाही कारण 2014 पासून ते आजपर्यंतच्या प्रत्येक भाषणात पंतप्रधान मोदींनी 150 हून अधिक वेळा काँग्रेसचे नाव घेतले आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले, 56 इंच छाती असणाऱ्या पंतप्रधान मोदींना काँग्रेस पक्षाची एवढी भीती का वाटते? असा खोचक सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला. तसेच पंतप्रधान बोलत होते तेव्हा त्यांना मी मोबाईलवर पाहत होतो. अनेक लोक त्यांना फेकू बोलत होते, तसंच मी बोलू शकत नाही अशा शब्दांत त्यांच्यावर लोक टीका करत होते. पंतप्रधान मोदी वारंवार खोटं बोलत असल्यामुळे जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला आहे, अशी टीका पटोलेंनी केली.
महिला आरक्षण विधेयक 2023 मध्ये आणले होते तेव्हा त्याला सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता आणि ते मंजूर देखील झाले होते. तेव्हा पंतप्रधानांनी म्हटलं होतं की, 2024 मध्ये जनगणना करून मतदारसंघांची पुनर्रचना केली जाई. आता 2026 सुरू आहे तरीही जनगणनेचा विषय प्रलंबित आहे. तसेच आता राहुल गांधींच्या दबावामुळे जनगणना करण्याची तयारी दाखवावी लागली, असं नाना पटोले म्हणाले.
सध्या सुरू झालेल्या जनगणनेत ओबीसीसाठी वेगळा स्तंभ ठेवण्यात आलेला नाहीये. यावरून बहुजन समाजाच्या विरोधात पंतप्रधान मोदी आहेत, हे स्पष्ट दिसून येत आहे, असं वक्तव्यही पटोलेंनी केलं.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 13 टक्के महिलांना तिकिटे दिली होती. तर भाजपने फक्त 10 टक्के तिकिटे महिलांना दिली होती. महिलांचा सन्मान भाजपला करायचा नाहीये, मात्र आम्ही महिलांचा सन्मान केला आहे. एकीकडे नारी शक्तीला नमन करायचं आणि दुसरीकडे मणिपूर्या महिलांचा अपमान झाला तरी पंतप्रधान यावर काहीही बोलत नाहीत, अशी टीकाही पटोलेंनी केली आहे.











