Baramati and Rahuri Assembly By-elections: राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या बारामती आणि राहुरी (अहिल्यानगर) या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये आज, २३ एप्रिल रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. या दोन्ही जागा रिक्त झाल्याने ही निवडणूक आवश्यक ठरली आहे.
बारामती मतदारसंघातील जागा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या पत्नी आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत. मतदानापूर्वी त्या अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करणार आहेत.
बारामतीमध्ये ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी काही प्रयत्न झाले होते. मात्र सुरुवातीला निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेल्या काँग्रेसने अखेरीस आपला उमेदवार मागे घेतला. त्यामुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड मानले जात आहे.
हेही वाचा: घरच्या घरी बनवा सकाळच्या नाश्त्याला ज्वारीची बटाटा पुरी; सोपी आणि झटपट रेसिपी
दुसरीकडे, राहुरी मतदारसंघात भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली. येथे भाजपकडून त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले रिंगणात आहेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे गोविंद मोकाटे हे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत.
राहुरीमध्ये एकूण 22 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले असून लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांच्यासह इतरही उमेदवार रिंगणात आहेत. तसेच राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट भूमिका न घेतल्याने त्यांच्या समर्थकांचा कल कोणाकडे असेल, याकडेही लक्ष आहे.
राहुरी मतदारसंघात सुमारे 3.33 लाख मतदार असून 374 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरळीत मतदानासाठी सुमारे 2,180 अधिकारी-कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोटनिवडणुकीचा कार्यक्रम
अधिसूचना जाहीर: 30 मार्च 2026
उमेदवारी अर्जाची शेवटची तारीख: 6 एप्रिल 2026
अर्जांची छाननी: 7 एप्रिल 2026
अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख: 9 एप्रिल 2026
मतदान: 23 एप्रिल 2026
मतमोजणी: 4 मे 2026
निवडणूक प्रक्रिया पूर्ण: 6 मे 2026
आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले असून मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.












