Sunetra Pawar | आज महाराष्ट्रातील दोन जागांवर पोटनिवडणूक होत आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनामुळे बारामतीत पोटनिवडणूक (Baramati By-election) घेणे आवश्यक झाले आहे. तर आता बारामती विधानसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. तसेच बारामतीसोबत राहुरी (Rahuri) येथेही आज मतदान पार पडत आहे.
हेही वाचा – अशोक खरातच्या पत्नीने मारली पलटी, सगळं नवऱ्यावर ढकलून झाली रिकामी, कोर्टात दिली धक्कादायक कबुली
मतदानापूर्वी सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या स्मारकाला दिली भेट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवत आहेत. तर सुनेत्रा पवार यांच्या विरोधात 23 अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवत आहेत. विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही स्वीकारली आहे. तर आज सकाळी मतदानासाठी जाण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली. यावेळी सुनेत्रा पवार भावूक झालेल्या दिसल्या.
सुनेत्रा पवार अजित पवारांच्या आठवणीत झाल्या भावूक
मतदान केल्यानंतर सुनेत्रा पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या अजित पवारांच्या आठवणीत भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्या म्हणाल्या की, “ही पोटनिवडणूक सर्वच बाजूने अत्यंत भावनिक निवडणूक आहे. अजित दादांशिवाय कोणतीही गोष्ट करण्याची आपल्याला सवय नव्हती. मात्र, आज ते आपल्यात नाहीत हे मानून चालावं लागेल. आज बारामतीची जनता एक कर्तव्य म्हणून मतदानासाठी बाहेर पडत आहे. अजितदादांनी बारामतीकरांसाठी इतकी वर्षं केलेल्या योगदानाची परतफेड म्हणून आज बारामतीकर मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडत आहेत, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने या देशाची एक जबाबदार नागरिक म्हणून काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मतदानाचा हक्क बजावला.
लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा मूलभूत हक्क बजावावा. pic.twitter.com/6quwtmdNCD— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) April 23, 2026
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी त्यांचा वारसा पुढे चालवला आहे. अजित पवारांच्या जागी त्यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदीही त्यांची निवड झाली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर काही दिवसांतच त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता त्या विधानसभा निवडणूक जिंकून आमदार होण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित पवार यांच्याप्रती आदर म्हणून सर्व विरोधी पक्षांनी या जागेसाठी उमेदवार उभे केलेले नाहीत. मात्र अपक्ष उमेदवार जरी सुनेत्रा पवार यांना आव्हान देत असले तरी, त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
दरम्यान, बारामतीसोबत दुसरीकडे अहमदनगरमधील राहुरी येथेही मतदान पार पडत आहे. भाजप पक्षाचे आमदार शिवाजी कार्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघात जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. तर या जागेवर सर्व प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार दिल्यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची होण्याची शक्यता आहे. या निवडणूकीसाठी भाजपकडून शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरेचे बंडखोर उमेदवार रावसाहेब खेवरे हे अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोबतच वंचित बहुजन आघाडीने संतोष चोळके यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता या निवडणूकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.












