Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • खरात प्रकरण दाबण्यासाठी निदाच्या मागे, जलील यांना पुळका!
Top News

खरात प्रकरण दाबण्यासाठी निदाच्या मागे, जलील यांना पुळका!

Kharat case Nida Khan Jalil controversy

Kharat case Nida Khan Jalil controversy : नाशिकमध्ये सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले असून एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सत्ताधारी महायुती सरकार आणि प्रशासनावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. जलील यांनी नाशिकमधील गाजत असलेल्या ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणाचा थेट संबंध ‘अशोक खरात’ प्रकरणाशी जोडला असून हे सर्व एका मोठ्या राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, एका मोठ्या सेक्स स्कँडलमधील प्रभावशाली नेत्यांना वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक एका मुस्लिम मुलीला बळीचा बकरा बनवण्यात आले आहे. असं जलील म्हणतायत…पण खरंच खरात प्रकरण दाबण्यासाठी कार्पोरेट जिहादचं प्रकरण उचलून धरण्यात आलं का? निदा खानवरील आरोप किती खरे आणि किती खोटे? जलील यांना निदाचा नेमका का पुळका आलाय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नाशिकमध्ये ‘कॉर्पोरेट जिहाद’ किंवा धर्मांतराचे प्रकरण

इम्तियाज जलील यांनी आपल्या भूमिकेत स्पष्टपणे नमूद केलंय की, नाशिकमधील कथित ‘कॉर्पोरेट जिहाद’ किंवा धर्मांतराचे जे प्रकरण समोर आणले गेले, ते मुळात अस्तित्वातच नाही. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सारख्या नामांकित कंपनीत काम करणाऱ्या निदा खान या तरुणीवर धर्मांतराचे जे आरोप लावले गेले, ते पूर्णपणे निराधार आणि कल्पित आहेत. जलील यांच्या मते, हे प्रकरण उकरून काढण्यामागे एक विशिष्ट राजकीय अजेंडा आहे. नाशिकमध्ये ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’ नंतर आता ‘कॉर्पोरेट जिहाद’ हा नवीन शब्दप्रयोग करून समाजातील ध्रुवीकरण वाढवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षांकडून केला जात आहे, असा घणाघात त्यांनी केला आहे. निदा खान ही केवळ एक सामान्य कर्मचारी असून तिला विनाकारण देशद्रोही किंवा गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न मीडिया आणि काही संघटनांनी केला आहे, ज्यामुळे तिच्या कुटुंबाची सुरक्षा धोक्यात आली आहे.

सेक्स स्कँडल दाबण्यासाठी निदा खान जिहादचे प्रकरण

जलील यांच्या आरोपाचा सर्वात महत्त्वाचा भाग हा अशोक खरात प्रकरणाशी संबंधित आहे. नाशिकमधील ज्योतिषी आणि कथित आध्यात्मिक गुरु अशोक खरात याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे अत्यंत भीषण आरोप आहेत. या प्रकरणात केवळ खरातच नाही, तर अनेक हाय-प्रोफाईल व्यक्ती, बडे व्यापारी आणि सत्ताधारी पक्षाशी संबंधित नेत्यांची नावे चर्चेत आली होती. जलील यांनी असा दावा केला आहे की, खरात प्रकरणाची व्याप्ती इतकी मोठी आहे की, जर त्याचा सखोल तपास झाला असता तर सरकारमधील अनेक बड्या चेहऱ्यांचे खरे स्वरूप समोर आले असते. हे सेक्स स्कँडल दाबण्यासाठी आणि जनतेचे लक्ष या मूळ आणि संवेदनशील मुद्द्यावरून वळवण्यासाठी अचानक निदा खान आणि कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण बाहेर काढण्यात आले.

पोलीस यंत्रणा निदा खानच्या मागे हात धुऊन लागली – जलील

जलील यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका बाजूला अशोक खरात प्रकरणातील पीडितांना न्याय मिळवून देण्याऐवजी आणि मुख्य सूत्रधारांना अटक करण्याऐवजी पोलीस यंत्रणा निदा खानच्या मागे हात धुऊन लागली आहे. टीसीएस कंपनीने सुरुवातीला या प्रकरणावर मौन बाळगले होते, परंतु जलील यांनी विचारणा केल्यानंतर कंपनीकडून आलेल्या स्पष्टीकरणातही अनेक विसंगती असल्याचा आरोप त्यांनी केला. निदा खानला ज्या पद्धतीने मीडियासमोर सादर केले गेले, तिला ज्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले आणि तिच्या खासगी आयुष्यावर ज्या प्रकारे शिंतोडे उडवले गेले, ते अत्यंत निंदनीय असल्याचे जलील यांनी म्हटले आहे. हे सर्व एका ‘टूलकिट’चा भाग असून विशिष्ट समुदायाला बदनाम करण्यासाठी हे रचले गेले आहे, असा त्यांचा आरोप आहे.

निदा खानच्या विरोधात ठोस पुरावे नसताना मानसिक त्रास दिला

या संपूर्ण वादात जलील यांनी आक्रमक पवित्रा घेत इशारा दिला आहे की, जर निदा खानच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नसताना तिला मानसिक त्रास दिला गेला, तर एमआयएम पक्ष गप्प बसणार नाही. त्यांनी असा सवाल उपस्थित केला की, खरात प्रकरणातील त्या पेन ड्राईव्हचे काय झाले ज्यामध्ये अनेक बड्या नेत्यांचे क्लिप्स असल्याचा दावा केला जात होता? तो तपास का थांबला आणि मीडियाने अचानक खरात प्रकरणावर चर्चा करणे का बंद केले? या प्रश्नांची उत्तरे शोधली तर ‘कॉर्पोरेट जिहाद’ हे प्रकरण किती पोकळ आहे हे लक्षात येईल, असे जलील यांचे ठाम मत आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

राजकीय विश्लेषकांच्या मते, जलील यांनी उचललेला हा मुद्दा नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवू शकतो. एका बाजूला धर्मांतराचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत, तर दुसरीकडे जलील यांनी याला ‘सेक्स स्कँडल’ लपवण्याचे हत्यार ठरवून सत्ताधाऱ्यांना पेचात टाकले आहे. जलील यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय, राज्यातील मुलींची सुरक्षा महत्त्वाची आहे की आपल्या नेत्यांचे काळे कारनामे लपवणे? असा सवाल त्यांनी केलाय.

टीआरपीसाठी एका तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका – जलील

अशोक खरात प्रकरणातील पिडीत महिलांच्या बाजूने उभे राहण्याऐवजी प्रशासन एका काल्पनिक जिहादच्या कल्पनेत अडकले आहे, हा जलील यांचा आरोप जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणारा ठरला आहे. त्यांनी मीडियालाही कडक शब्दात सुनावले असून, टीआरपीसाठी एका तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका, अशी विनंती केली आहे. निदा खान प्रकरणात जोपर्यंत अधिकृत चार्जशीट दाखल होत नाही किंवा ठोस पुरावे समोर येत नाहीत, तोपर्यंत तिला गुन्हेगार ठरवणे हा कायद्याचा अपमान आहे, असेही ते म्हणालेत.

निदा खान आणि अशोक खरात प्रकरणांची सांगड

इम्तियाज जलील यांनी निदा खान आणि अशोक खरात या दोन भिन्न वाटणाऱ्या प्रकरणांची सांगड घालून नाशिकच्या प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेवर मोठा बॉम्ब टाकला आहे. हे प्रकरण केवळ एका मुलीचे किंवा एका ज्योतिषाचे नसून, ते नाशिकमधील सत्तेच्या समीकरणांचे आणि भ्रष्टाचाराचे असल्याचे चित्र जलील यांनी उभे केले आहे. आता पोलीस प्रशासन खरात प्रकरणाचा तपास पुन्हा वेगाने करते की कॉर्पोरेट जिहादच्या आरोपांवर अधिक लक्ष केंद्रित करते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जलील यांच्या या आरोपांमुळे आता या प्रकरणात खरात प्रकरण लपवण्याच्या अँगलचीही चर्चा सुरू झाली आहे, कारण खरातसोबत एवढ्या बड्या नेत्यांचे फोटो होते की त्यातील एखादं जरी आरोपांचं प्रकरण खरं निघालं असतं, तर खळबळ माजली असती, आधीच खरातला महायुतीला मोठा दणका दिलाय, कारण खरातमुळे रुपाली चाकणकर आपली दोन्ही मोठी पदं गामावून बसल्या आहेत, त्यामुळे अनेक नेत्यांचा नंबर येईल अशा चर्चा सुरू होत्या, मात्र नंतर खरात फाईल्स काय झालं? याबद्दल अजून तरी शांतताच आहे…त्यामुळे जलील यांच्या आरोपांत भविष्यात किती तथ्य निघतं, हे कळेलच…

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts