RCB Last Ball Victory : आयपीएलच्या 19 व्या मोसमात (IPL 19th season) रविवारी झालेल्या डबल हेडरने क्रिकेट चाहत्यांची अक्षरशः धडधड वाढवली. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्स ला धूळ चारत प्लेऑफच्या दिशेने दमदार पाऊल टाकलं. पण दिवसाचा खरा थरार रंगला तो मुंबई विरुद्ध बंगळुरु (Mumbai Vs Bangalore) सामन्यात! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) शेवटच्या चेंडूवर 2 धावा काढत मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) जबरदस्त पराभव केला आणि प्लेऑफची आशा आणखी बळकट केली.
हेही वाचा – राजस्थानचा 77 धावांनी धुव्वा, गुजरात दुसऱ्या स्थानावर, क्रमवारीत उलथापालथ
मुंबईची सुरुवातच हादरवणारी ठरली. भुवनेश्वर कुमारने टॉप ऑर्डरचं अक्षरशः कंबरडंच मोडलं. रायन रिकेल्टन, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना स्वस्तात तंबूत धाडत मुंबईला मोठा धक्का दिला. रोहितने 22 धावा केल्या, तर सूर्यकुमारला खातेही उघडता आलं नाही. अडचणीत सापडलेल्या मुंबईला तिलक वर्मा आणि नमन धीर यांनी सावरलं. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 82 धावांची महत्त्वाची भागीदारी करत डाव उभा केला. नमनचं अर्धशतक अवघ्या 3 धावांनी हुकलं, तर तिलकने शानदार 57 धावा फटकावत मुंबईला 167 पर्यंत पोहोचवलं.
167 धावांचा पाठलाग करताना बंगळुरुची सुरुवातही डगमगली. विराट कोहली पहिल्याच ओव्हरमध्ये शून्यावर बाद झाला. देवदत्त पडीक्कल आणि कर्णधार रजत पाटीदारही लवकर परतल्याने आरसीबी अडचणीत आली. पण कृणाल पंड्या नावाचा ‘संकटमोचक’ मैदानात उभा राहिला! जेकब बेथलसोबत त्याने डाव सावरत चौथ्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली. कृणालने संयमी पण आक्रमक खेळी करत अवघ्या 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.
सामना शेवटच्या षटकात पोहोचला तेव्हा आरसीबीला विजयासाठी 15 धावा हव्या होत्या. रोमारियो शेफर्ड बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत मुंबईच्या गोटात खळबळ उडवली. शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज… तणाव शिगेला… आणि रसीख सलाम डारने शांतपणे 2 धावा पूर्ण करत आरसीबीला अविस्मरणीय विजय मिळवून दिला! या विजयासह बंगळुरुने प्लेऑफचं तिकीट जवळपास निश्चित केलं असून मुंबईच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत.












