Neet Exam Paper Leak Case | सध्या नीट परीक्षेचा पेपर लीक (NEET Paper Leak) झाल्यामुळे संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली आहे. नीट परीक्षेच्या (Neet Exam) पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पेपरफुटीमुळे नीट परीक्षा रद्द करण्यात आली असून लाखो विद्यार्थी तणावात आहेत. तर सध्या नीट पेपर लीक प्रकरणाचा तपास राजस्थान एसओजीकडून (SOG) केला जात आहे. आत्तापर्यंत एसओजीने 14 जणांना ताब्यात घेतले असून काही धक्कादायक खुलासे झाले आहेत.
हेही वाचा – देशसेवेचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी! CRPF मध्ये मेगा भरती; जाणून घ्या पात्रता, जागा अन् अर्जाची तारीख
NEET पेपर लीक प्रकरणात नेमके काय झाले खुलासे?
नीट परीक्षा 3 मे रोजी पार पडली होती. त्यानंतर काही लोकांनी 7 मे रोजी पोलिसांकडे पेपरफुटीची तक्रार दाखल केली होती. तक्रारदारांचा दावा आहे की, नीट परीक्षेपूर्वी बाजारात एक गेस पेपर आला होता. या हस्तलिखित 150 पानांच्या गेस पेपरमध्ये 410 प्रश्न होते आणि त्यातील 120 प्रश्न नीट परीक्षेत विचारण्यात आले होते. तसेच 720 गुणांच्या प्रश्नपत्रिकेपैकी 600 प्रश्न बाजारात उपलब्ध असलेल्या एका अंदाजित प्रश्नपत्रिकेतून आले होते.
बाजारात उपलब्ध असलेली ही अंदाजित प्रश्नपत्रिका कोणी तयार केली याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. असा दावा केला जात आहे की, केरळमधून एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या चुरू येथील एका मुलाने ही अंदाजित प्रश्नपत्रिका सीकरमधील आपल्या मित्राला पाठवली होती. तसेच त्या मित्राने ती अंदाजित प्रश्नपत्रिका एका पीजी ऑपरेटरला दिली. यानंतर ती शेकडो लोकांपर्यंत पोहोचली, अशी माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये राकेश मांडावरिया यांचा समावेश आहे. राकेश यांना डेहराडूनमध्ये अटक करण्यात आली. राकेश हे सीकरचे रहिवासी असून ते करिअर सल्लागार आहेत.
दरम्यान, राष्ट्रीय चाचणी संस्थेने (National Testing Agency) म्हटले आहे की, नीट (NEET) परीक्षा कडक सुरक्षा व्यवस्थेत घेण्यात आली होती. प्रश्नपत्रिका जीपीएस-ट्रॅक केलेल्या वाहनांमधून पोहोचवण्यात आल्या होत्या. परीक्षा केंद्रांवर एआय-सहाय्यित सीसीटीव्ही आणि 5जी जॅमर्स यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. देशभरात परीक्षेदरम्यान सुरक्षेत कोणतीही त्रुटी किंवा अनियमितता आढळली नाही. मात्र, राजस्थानमधून काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत ज्याची एजन्सी चौकशी करत आहे.












