Congress Corporators Not Reachable : राज्यात विधानपरिषद निवडणुकीचा (Maharashtra Politics) बिगुल वाजलाय. प्रत्येक पक्ष आपापला संघटनाबांधणीसाठी प्रयत्न करताना दिसत आहे. काही जागेंवर उमेदवार निश्चित झालेत मात्र अजूनही ९० टक्के जागेंवर उमेदवार निश्चित नसतांना, इकडे कॉंग्रेसचे (Congress) दमदार असलेले नेतृत्व विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना मोठा धक्का बसला आहे. कारण राज्य पातळीवर कितीही विरोधकांना अंगावर आणि शिंगावर घेणारे वडेट्टीवार मात्र स्वतःच्या बालेकिल्ल्यात स्वतःच्या कार्यकर्त्यांना सांभाळायला अपयशी ठरलेत असंच म्हणावं लागेल.
कारण चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून काँग्रेसचे तब्बल ६० ते ७० नगरसेवक अचानक नॉट रिचेबल झालेले आहेत, यामध्ये सिंदेवाही नगरपंचायतीचे नगराध्यक्ष भास्कर नंनावरे आणि अनेक महत्त्वाच्या सदस्यांचा समावेश आहे. नगरसेवक आणि अनेक स्थानिक कार्यकर्ते गायब झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर थेट घोडेबाजाराचा आरोप केलाय. त्यांनी दावा केलाय की, भाजपने या नगरसेवकांना प्रत्येकी ५ ते १५ लाख रुपये देऊन उचललं आहे. कोण कोण गेलं आहे कोण याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत, सत्तेच्या जोरावर आणि पैशांच्या जोरावर त्यांनी नगरसेवकांना उचलले आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
आम्ही व्हीप जारी करून त्यांच्या घरांवर चिपकवणार
पैशाने आमचे सगळे लोक विकली गेली आहेत, आता आम्ही व्हीप जारी करून त्यांच्या घरांवर चिपकवणार आहोत, त्यांना अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू करू, असेही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्यासमवेतचा नगरसेवकांचा फोटो समोर आला आहे. त्यासंदर्भात, फोटो कधीचा आहे, तो जुना आहे की आत्ताचा आहे हे मला काही सांगता येणार नाही. परंतु एक नक्की आहे की, चंद्रपूरमध्ये घोडा बाजार तेजीत आहे.
पैशाची गर्मी आणि मस्ती येतेच, ती मस्ती त्यामध्ये दिसते
या घोडे बाजाराची गरजही नव्हती, पण आमदार ठेकेदार झाल्यानंतर पैशाची गर्मी आणि मस्ती येतेच, ती मस्ती त्यामध्ये दिसते आहे. बिनाश्रमाने लोकप्रतिनिधी म्हणून आता आमदारच ठेकेदार व्हायला लागले तर राजकारणात काय नीतिमत्ता राहिल, असा सवालच विजय वडेट्टीवार यांनी विारला आहे. सत्ता आणि पॉवर दोन्ही एकत्र घेऊन काम होत राहिलं तर सामान्य जनतेचे हाल होणारच आहेत, असेही त्यांनी म्हटलं.
बँकेचे संचालक, सरपंचाच्या मुलाला तुरुंगात टाकण्याची धमकी
राज्यात जर सत्ता नसती तर कुत्रंही मागे गेलं नसतं, कोणात किती दम आहे. सत्तेचा उपयोग करुन काही लोकांना घाबरवलेलं आहे, बँकेच्या संचालकांना, सरपंचाच्या मुलाला तुरुंगात टाकण्याची धमकी देऊन राजकारण सुरू आहे. मी पुन्हा जबाबदारीने सांगतो पाच- पाच लाख रुपये देऊन नगरसेवकांना नेण्यात आलं आहे, माझ्याकडे तसे पुरावे आहेत, असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. माझ्या लोकांचे सगळे रेकॉर्ड आहेत, किती किती पैसे घेतले, जे झालं ते क्लिअर आहे, आता ऍडव्हान्स दिला आहे पुन्हा काही देतील. कोणी म्हणतं दहा लाख देऊ, कोणी म्हणतो 15 लाख देऊ, कोणी म्हणतो काँग्रेसचे डबल देऊ अशी चर्चा असल्याचेही वडेट्टीवार यांनी म्हटलं.












