Amravati SNCU Fire : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसएनसीयू अग्नितांडवाने संपूर्ण आरोग्य यंत्रणेला हादरवून सोडले आहे. तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर आता या दुर्घटनेमागची कारणे शोधण्यासाठी तज्ज्ञ समित्यांकडून चौकशी सुरू आहे. प्राथमिक पाहणीत व्हेंटिलेटरचा ( ventilator ) स्फोट झाल्याचे समोर आले असले, तरी हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. विशेष म्हणजे, २०२२ मध्ये याच रुग्णालयाच्या एसएनसीयूमध्ये स्फोट झालेल्या व्हेंटिलेटरची कंपनी आणि आताच्या दुर्घटनेतील व्हेंटिलेटरची कंपनी एकच असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने पूर्वी विरोध केलेल्या या कंपनीच्या व्हेंटिलेटरला पुन्हा वापरण्याची परवानगी का देण्यात आली, हा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे.
SNCU आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू ( Amravati SNCU Fire )
जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील एसएनसीयू विभागात सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणांतच विभागात धूर पसरला आणि नवजात बालकांना वाचविण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची धावपळ सुरू झाली. मात्र, या बचावकार्यादरम्यान तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर तज्ज्ञ समित्यांनी एसएनसीयूतील जळालेले व्हेंटिलेटर, वॉर्मर, एसी आणि इतर तांत्रिक उपकरणांची पाहणी केली. प्रत्यक्षदर्शी कर्मचाऱ्यांनी व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन मोठा आवाज झाल्याची माहिती दिली. त्यामुळे प्राथमिकदृष्ट्या आग व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे लागल्याचे मानले जात आहे. मात्र, स्फोटामागचे तांत्रिक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
याच ठिकाणी आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे तो व्हेंटिलेटरच्या कंपनीचा. २५ सप्टेंबर २०२२ रोजी जुन्या इमारतीतील एसएनसीयूमध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट ( ventilator )होऊन आग लागली होती. त्यावेळीही संबंधित व्हेंटिलेटर त्याच कंपनीचा असल्याचा दावा करण्यात आला होता. त्या घटनेनंतर कंपनीच्या व्हेंटिलेटरच्या वापराबाबत आरोग्य विभागात नाराजी आणि विरोध असल्याचे सांगितले जाते.
नवीन इमारतीतील एसएनसीयू सप्टेंबर २०२५ मध्ये कार्यान्वित करण्यात आला. विभाग सुरू करण्यापूर्वी उपकरणांची चाचणी घेण्यात आली. संबंधित व्हेंटिलेटर चाचणीत योग्य असल्याचे सांगण्यात आले, मात्र २०२२ मधील घटनेचा संदर्भ देत एसएनसीयूमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी या व्हेंटिलेटरच्या वापराला विरोध केला होता, अशी माहिती समोर येत आहे. तरीही त्याच कंपनीचे व्हेंटिलेटर वापरण्याची परवानगी का देण्यात आली, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा : नेपाळमध्ये महापुराचा कहर! 160 जणांचा मृत्यू, 750 बेपत्ता; पुरामागचं धक्कादायक कारण काय?
व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज ( Amravati SNCU Fire )
इतकेच नाही, तर या व्हेंटिलेटरमध्ये मागील काही महिन्यांत तांत्रिक बिघाड झाले होते का? बिघाडामुळे ते काही दिवस बंद ठेवण्यात आले होते का? त्याची दुरुस्ती नेमकी कशी करण्यात आली? दुरुस्तीनंतर उपकरणाची सुरक्षा तपासणी झाली होती का? या सर्व प्रश्नांची उत्तरे चौकशीतून मिळणे आवश्यक आहे. दुसरीकडे, नवीन इमारतीमध्ये एसएनसीयू सर्वात वरच्या मजल्यावर उभारण्याचा निर्णय का घेण्यात आला, हादेखील तपासाचा विषय ठरला आहे. एसएनसीयूसारख्या अतिसंवेदनशील विभागासाठी आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याची व्यवस्था, फायर अलार्म, अग्निशमन यंत्रणा आणि पर्यायी मार्ग यांची पुरेशी व्यवस्था होती का, याचीही तपासणी गरजेची आहे.
फायर ऑडिटच्या मुद्द्यावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फायर ऑडिटची मुदत संपल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने संबंधित यंत्रणेला पत्रव्यवहार केला होता का? त्यानंतर पुन्हा फायर ऑडिट झाले का? आगीच्या वेळी फायर अलार्म कार्यरत होता का? आणि विद्युत उपकरणे असलेल्या एसएनसीयूमध्ये आग विझविण्यासाठी बसवण्यात आलेली यंत्रणा योग्य प्रकारची होती का, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.
यासोबतच एसएनसीयूची विद्युत वायरिंग, व्हेंटिलेटर, वॉर्मर आणि एसी यांचा एकत्रित वीजभार लक्षात घेऊन वायरिंग करण्यात आली होती का, याची तांत्रिक तपासणीही महत्त्वाची ठरणार आहे.
फायर ऑडिट आणि विद्युत सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह ( Amravati hospital fire )
दरम्यान, काही तज्ज्ञांकडून व्हेंटिलेटरची ( ventilator ) बॅटरी कालबाह्य असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे कॉम्प्रेसरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, हा केवळ प्राथमिक अंदाज असून अंतिम कारण तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. या संपूर्ण प्रकरणात वैद्यकीय आयुक्तांनी गठित केलेल्या समितीकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लेखी जबाब नोंदवले जात आहेत. घटनेच्या वेळी कोण कुठे होते, आग कशी लक्षात आली, बालकांना बाहेर काढताना कोणत्या अडचणी आल्या, याची माहिती घेतली जात आहे. पीडित पालकांची बाजूही नोंदवण्यात आली आहे.
तीन नवजात बालकांचा जीव गेल्यानंतर आता केवळ आग कशामुळे लागली, एवढ्यापुरती चौकशी मर्यादित राहून चालणार नाही. २०२२ मध्ये झालेल्या घटनेनंतरही त्याच कंपनीच्या उपकरणांचा वापर का झाला, डॉक्टरांच्या कथित विरोधाकडे दुर्लक्ष का करण्यात आले, फायर ऑडिट आणि विद्युत सुरक्षेच्या उपाययोजना कितपत प्रभावी होत्या आणि या दुर्घटनेला नेमकी जबाबदारी कोणाची, या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे. तज्ज्ञ समितीच्या अंतिम अहवालातून या प्रश्नांवर प्रकाश पडतो का आणि तीन चिमुकल्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण ठरते, याकडे आता संपूर्ण अमरावतीचे लक्ष लागले आहे.









