Pandharpur Murder Case : ते म्हणतात ना, प्रेमाला वय नसतं, मात्र त्याच प्रेमाचा कोणत्याही वयात गेमही होऊ शकतो बरं का…असंच एक हादरवून टाकणारं प्रकरण सोलापुरातून समोर आलंय, सत्तरीतलं प्रेम…मात्र आजीनं प्रियकराचा थेट मर्डर केला…मृतदेह अर्धवट जाळला आणि शेतातच पुरला…हे सगळं हादरवून टाकणारं प्रकरण नेमकं काय आहे?
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात वयाच्या सत्तरीत पोहोचलेल्या दोन वयोवृद्धांच्या प्रेमसंबंधाचा अत्यंत धक्कादायक आणि रक्तरंजित अंत झालाय, ७० वर्षीय अंबादास खांडेकर यांच्या निर्घृण हत्याप्रकरणी त्यांची ७० वर्षीय प्रेयसी मंगल होनमाने हिला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. वयाच्या ज्या टप्प्यावर लोक नातवंडांना खेळवण्यात आणि देवाचे नाव घेण्यात मग्न असतात, अशा उतरत्या वयात दोन वयोवृद्धांमध्ये जुळलेल्या अनैतिक प्रेमसंबंधांची परिणती थेट खुनामध्ये होईल, अशी कल्पना कोणीही केली नव्हती.
पंढरपूरमध्ये प्रेमसंबंधातून ७० वर्षीय व्यक्तीची हत्या ( Pandharpur Murder Case )
मृत अंबादास खांडेकर आणि आरोपी महिला मंगल होनमाने यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते पंढरपूर तालुक्यातील एका गावात वारंवार भेटत असत. २७ जुलै रोजी त्यांच्यात क्षुल्लक विषयावरून तीव्र वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर बघता बघता भीषण हिंसाचारात झाले आणि रागाच्या भरात मंगल होनमाने हिने एका निर्जन शेतामध्ये अंबादास खांडेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केली. केवळ हत्या करूनच ती थांबली नाही, तर हा अंगावर काटा आणणारा गुन्हा लपवण्यासाठी तिने अंबादास खांडेकर यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत शेतात पुरून टाकला आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
यानंतर सुमारे आठवड्याभराने, म्हणजेच २ ऑगस्ट रोजी, गावातील काही शेतकऱ्यांना शेतात अर्धवट जळालेल्या अवस्थेत एक अज्ञात मृतदेह पुरलेला आढळला. त्यांनी तातडीने स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला, परंतु मृतदेह अत्यंत जळालेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले होते. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक टीमला पाचारण केले आणि मृतदेहाचे नमुने डीएनए चाचणीसाठी पाठवले. दरम्यानच्या काळात अंबादास खांडेकर हे बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती, ज्यावरून संशय बळावला. पोलिसांनी तपास पुढे नेत खांडेकर यांच्या दोन्ही मुलींचे डीएनए नमुने गोळा केले आणि ते चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले.
हेही वाचा : मुंबई कोस्टल रोडवर काळरात्र! भरधाव BMWचा अपघात, तिघांचा मृत्यू;
फॉरेन्सिक तपासातून मिळाले महत्त्वाचे धागेदोरे ( Ambadas Khandekar Murder )
या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा उलगडा होण्यासाठी तब्बल दीड महिन्यांचा कालावधी लागला. प्रयोगशाळेतून आलेल्या डीएनए चाचणीच्या अहवालात मृतदेह बेपत्ता अंबादास खांडेकर यांचाच असल्याचे आणि त्यांच्या मुलींच्या नमुन्यांशी जुळत असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाची ओळख पटताच पंढरपूर पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची चक्रे फिरवली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अवघ्या १२ तासांच्या आत मुख्य संशयित महिला मंगल होनमाने हिला ताब्यात घेतले. पोलिसांच्या कडक चौकशीत आणि पोलिसी खाक्या दाखवताच मंगल हिने आपला गुन्हा कबूल केला. अनैतिक संबंधांमधील भांडणाचा आणि वादाचा राग सहन न झाल्यानेच तिने अंबादास खांडेकर यांचा काटा काढल्याचे पोलिसांना सांगितले. वयाच्या सत्तरीतील या भयानक आणि हिंसक प्रेमकथेचा पर्दाफाश झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रियेला गती आली असून, या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास पंढरपूर पोलीस करत आहेत.









