Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Himanshu Bhau : लॉरेन्स बिश्नोईचा कट्टर शत्रू अमेरिकेत पकडला? कोण आहे हा हिमांशू भाऊ?
गुन्हा

Himanshu Bhau : लॉरेन्स बिश्नोईचा कट्टर शत्रू अमेरिकेत पकडला? कोण आहे हा हिमांशू भाऊ?

Himanshu Bhau Arrested in US
30

Himanshu Bhau Arrested in US : सध्या अंडरवर्ल्डच्या बाजारात एका नावाचा राडा सुरूये, लॉरेन्स बिष्णोई…. मात्र लॉरेन्स बिष्णोईला टक्कर देणारा त्याचा जानी दुश्मन म्हणजे हिमांशू भाऊ (Himanshu Bhau), वय अवघं चोवीस वर्ष, पण गुन्हेगारीच्या दुनियेत या पोरानं जी दहशत निर्माण केली होती, तिची चर्चा थेट दिल्लीपासून ते अमेरिकेच्या एफबीआयपर्यंत पोहोचली होती. ज्या लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा दरारा सध्या बॉलीवूडवर आहे, त्या लॉरेन्स बिश्नोईला शिंगावर घेणारा हा हिमांशू भाऊ अखेर अमेरिकेत पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. अमेरिकेची सगळ्यात मोठी तपास यंत्रणा म्हणजेच एफबीआयने त्याला उचललं आणि तिथूनच या छोटा डॉनचा खेळ खलास व्हायला सुरुवात झाली.

कोण आहे हिमांशू भाऊ? (Himanshu Bhau)

हा सगळा राडा नेमका कुठून सुरू झाला, हे समजून घेण्यासाठी आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल…. हरियाणातील रोहतक जिल्हा आणि तिथलं रितोली नावाचं एक साधं गाव. या गावात राहणारा हिमांशू रितोलिया नावाचा हा मुलगा कधीकाळी हातात कबड्डीची माती घेऊन मैदानात उतरायचा. त्याला कबड्डी खेळायची होती, पण म्हणतात ना, नशिबाच्या आणि गुन्हेगारीच्या रेषा कधी आणि कशा बदलतील हे सांगता येत नाही. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी, हिमांशूच्या नावावर पोलिसांच्या डायरीत पहिली एफआयआर नोंदवली गेली. एका छोट्याशा वादातून सुरू झालेला हा प्रवास वयाच्या सतराव्या वर्षी थेट अटेम्प्ट टू मर्डरच्या गुन्ह्यापर्यंत पोहोचला. त्याने आपल्याच गावातील एका माणसावर गोळ्या झाडल्या. तो माणूस वाचला, पण हिमांशू बिश्नोईच्या आणि हरियाणाच्या पोलिसांच्या रडारवर आला. त्याला पकडून बालसुधारगृहात टाकण्यात आलं, पण इथूनच त्याच्या डोक्यातल्या गुन्हेगारीच्या कल्पनेनं एक मोठं रूप घेतलं.

बालसुधारगृह हे गुन्हेगार सुधारण्यासाठी असतं, पण हिमांशूसाठी तो गुन्हेगारीचा पहिला मोठा क्लास ठरला. २०२० मध्ये त्याने तिथून इतर काही कैद्यांना सोबत घेऊन फिल्मी स्टाईलने पळ काढला. इथून बाहेर पडल्यावर तो गावाकडे परत गेला नाही किंवा त्याने सरेंडर केलं नाही, तर त्याने स्वतःची गँग बनवायचं ठरवलं. हिमांशूचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याने आपल्या गँगमध्ये स्वतःच्याच वयाच्या पोरांना गोळा केलं. ही पोरं अशी होती ज्यांना कायद्याची भीती नव्हती आणि रक्ताचा ऊकळता जोश होता. या पोरांच्या जीवावर हिमांशूने हरियाणातल्या मोठ्या व्यापाऱ्यांना, जमीनदारांना धमकावून खंडणी गोळा करायला सुरुवात केली. पण हरियाणा छोटा पडू लागला होता आणि हिमांशूला दिल्लीच्या गादीवर बसायचं होतं. त्या वेळी दिल्लीत लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) गँगची दहशत वाढत होती. लॉरेन्सला टक्कर देण्यासाठी हिमांशूने त्याच्या विरोधी गटाशी हातमिळवणी केली. नीरज बवाना आणि बंबीहा गँग या दिल्ली-एनसीआरमधल्या अशा दोन टोळ्या आहेत ज्या लॉरेन्स बिश्नोईच्या रक्ताच्या तहानलेल्या आहेत. हिमांशू भाऊ या टोळ्यांच्या जवळ गेला. नीरज बवाना गँगचा वरदहस्त लाभताच हिमांशूला अत्याधुनिक शस्त्रं आणि पैसा मिळाला. आता तो फक्त हरियाणाचा एक साधा गुंड राहिला नव्हता, तर तो दिल्लीच्या अंडरवर्ल्डचा एक मोहरा बनला होता. या मोठ्या गँगवॉरमध्ये सामील झाल्यामुळे त्याची लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बराड यांच्याशी थेट आणि कट्टर दुष्मनी सुरू झाली.

हेही वाचा : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाला नवे वळण; हरियाणातून तिघे ताब्यात, तपासात महत्त्वाचे धागेदोरे!

दिल्ली-हरियाणातील गुन्हेगारी प्रकरणांमध्ये नाव (Haryana Gangster)

त्यानंतर आला २०२२ चा तो काळ, ज्या काळाने हिमांशू भाऊला भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार बनवलं. एकाच दिवशी, अवघ्या चोवीस तासांच्या आत हरियाणात तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन मोठे खून झाले आणि या तिन्ही खुनामागे एकाच पोराचं नाव समोर आलं, हिमांशू भाऊ (Himanshu Bhau) …. या हत्याकांडामुळे संपूर्ण दिल्ली आणि हरियाणा हादरून गेलं. पोलिसांचा शोध सुरु झाला, आणि त्याला भारत सोडण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्याने बनावट कागदपत्रं बनवली, बनावट पासपोर्ट तयार केला आणि पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून तो थेट पोर्तुगालला पळून गेला. पोर्तुगालहून पुढे तो अमेरिकेत पोहोचला. भारताबाहेर गेल्यावर गँगस्टर्स शांत बसतात असा एक समज असतो, पण हिमांशूने या समजाला पूर्णपणे सुरुंग लावला. तो परदेशात बसून भारताला नियंत्रित करणारा डिजिटल डॉन बनला. तो भारतीय पोलिसांना ट्रॅक करता येऊ नये म्हणून कधीही साधे फोन कॉल्स करत नसे. तो इंटरनेट कॉलिंग, व्हर्च्युअल नंबर्स आणि स्नॅपचॅट सारख्या सोशल मीडिया ॲप्सचा वापर करायचा.

अमेरिकेत बसून तो दिल्ली-एनसीआर मधील मोठ्या कार डीलर्स, बिल्डर्स आणि व्यापाऱ्यांना स्नॅपचॅटवर व्हॉईस नोट पाठवायचा आणि कोट्यवधी रुपयांची खंडणी मागयचा. जो पैसे देण्यास नकार द्यायचा, त्याच्या घरावर किंवा दुकानावर हिमांशूची पोरं थेट गोळीबार करायची. या गँगवॉरचा सर्वात थरारक आणि क्रूर चेहरा दिल्लीच्या राजौरी गार्डन भागात पाहायला मिळाला. तिथल्या एका प्रसिद्ध बर्गर किंग आउटलेटमध्ये अमन नावाचा एक तरुण आपल्या मैत्रिणीसोबत बसला होता. अचानक तिथे हिमांशू भाऊचे शूटर्स आले आणि त्यांनी अमनवर एकामागून एक तब्बल तीस पेक्षा जास्त गोळ्या झाडल्या. संपूर्ण रेस्टॉरंट रक्ताने माखलं होतं. या हत्याकांडाची जबाबदारी हिमांशू भाऊने सोशल मीडियावर पोस्ट टाकून उघडपणे घेतली. त्याने सांगितलं की, हा तरुण लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी काम करायचा आणि आमच्या माणसांची माहिती पोलिसांना द्यायचा, म्हणून त्याचा हा गेम केला. या एका घटनेने सिद्ध केलं की हिमांशू भाऊ लॉरेन्स बिश्नोईला नष्ट करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकत होता.

एल्विश यादवच्या घराबाहेरील गोळीबाराशी कथित संबंध

अगदी याच प्रकारे, काही काळापूर्वी प्रसिद्ध युट्युबर आणि बिग बॉस विजेता एल्विश यादवच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारातही हिमांशू भाऊचंच नाव समोर आलं होतं, कारण एल्विशचे संबंध लॉरेन्स बिश्नोईशी जोडले जात होते. वयाच्या अवघ्या चोवीस वर्षांत हिमांशू भाऊच्या नावावर ३० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल झाले होते. खून, खंडणी, अपहरण आणि दहशत माजवणं ही त्याची रोजची कामं झाली होती. भारतीय तपास यंत्रणांनी त्याच्या विरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. अमेरिकेत लपून बसलेला हा गुन्हेगार तिथल्या यंत्रणांच्या नजरेतून सुटू शकला नाही. अमेरिकेची एफबीआय आणि भारताच्या गुप्तहेर यंत्रणा यांच्यात झालेल्या मोठ्या समन्वयानंतर हिमांशूला अमेरिकेतून ताब्यात घेण्यात आलं. या अटकेमुळे लॉरेन्स बिश्नोईच्या विरोधी गटाला, म्हणजेच बंबीहा गँगला एक खूप मोठा झटका बसलाय. कारण परदेशात बसून बिश्नोई गँगला आर्थिक आणि शस्त्रास्त्रांच्या बाबतीत थेट आव्हान देणारा हिमांशू हा एकमेव हुकमी एक्का होता.

हेही वाचा : सलमान खानने बिश्नोई गँगची माफी मागावी? सदावर्तेंनी गँगवर काय म्हटलं?

हिमांशू भाऊला भारतात कधी आणणार? (Himanshu Bhau Arrested in US)

विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी लॉरेन्स बिश्नोईचा स्वतःचा भाऊ अनमोल बिश्नोई यालाही अमेरिकेत अशाच प्रकारे बनावट कागदपत्रांमुळे पकडण्यात आलं होतं आणि त्याला भारतात आणण्यात आलं होतं. आता लॉरेन्सच्या भावानंतर त्याच्या सर्वात कट्टर शत्रूला म्हणजेच हिमांशू भाऊलाही अमेरिकेतून उचलण्यात आलंय. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, आता गुन्हेगारांना परदेशात जाऊन लपणं अजिबात सोपं राहिलं नाहीये. हिमांशू भाऊची ही अटक दिल्ली-एनसीआर आणि हरियाणातील गँगवॉर संपवण्यासाठी एक मैलाचा दगड ठरू शकते. कारण ज्या अल्पवयीन मुलांचा वापर करून तो भारतात दहशत माजवत होता, त्या पोरांचा म्होरक्याच आता तुरुंगाच्या गजाआड जाणार आहे. आता भारतीय पोलीस त्याला कायदेशीर प्रक्रियेद्वारे भारतात आणण्याच्या म्हणजेच प्रत्यार्पणाच्या तयारीत आहेत. जेव्हा हिमांशू भाऊ भारतात येईल, तेव्हा अनेक मोठ्या गुन्ह्यांचे आणि गँगस्टर-राजकारणी संबंधांचे काळे चिठ्ठे बाहेर येण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts