Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यतील पेठवडगाव येथे एका धक्कादायक हत्याकांडाने परिसर हादरला आहे. भररस्त्यात नवऱ्याने बायकोची हत्या केल्याने परिसरात मोठा खळबळ उडाला. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात
‘आज माझा तरी शेवट नाहीतर पुढच्याचा…’; असा व्हाट्सअँप स्टेट्स ठेऊन पतीने पत्नीची भररस्त्यावर कोयत्याने हल्ला करत तिची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथील असून मृत महिलेचे नाव अमृता कांबळे (वय ३०) आहे तिचा पती दीपक कांबळे (वय ३५) याच्यावर हत्येचा आरोप आहे. बुधवारी (८ जुलै रोजी) सायंकाळच्या सुमारास पेठवडगाव येथील एसटी स्टँडच्या मागील भागात ही घटना घडली.
हेही वाचा: रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! १७ जुलैपर्यंत ‘या’ महत्त्वाच्या गाड्या धावणार नाहीत
वकिलाला भेटण्यासाठी गेलेल्या पत्नीवर हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, अमृता कांबळे या एका कामानिमित्त एसटी स्टँड परिसरातील एका कॉम्प्लेक्समध्ये वकिलाला भेटण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी दीपक कांबळे तिथे पोहोचला. दोघांमध्ये काही वेळ वाद झाला आणि त्यानंतर दीपकने जवळ असलेल्या कोयत्याने अमृता यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात अमृता गंभीर जखमी झाल्या. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमली होती. काही जणांनी हल्ला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने त्यांना दूर राहण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
आठ वर्षांपूर्वी झाला होता प्रेमविवाह
दीपक आणि अमृता यांचा सुमारे आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन मुली आहेत. पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
घटना घडण्यापूर्वी दीपकने मोबाईलवर ठेवलेल्या स्टेटसमुळे या प्रकरणाची अधिक चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या स्टेटसचा आणि हत्येचा नेमका संबंध तपासातून स्पष्ट होणार आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली असून, फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून आवश्यक नमुने गोळा केले आहेत.
यावेळी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, आरोपी अमृता कांबळे यांचे पती दीपक कांबळे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कामाला लागली आहेत.
या घटनेमुळे पेठवडगाव परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात असून, कौटुंबिक वादातून घडलेल्या या हत्येने पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.





