Breaking News :
  • Home
  • Pune
  • ‘3 लाखांत पदवी?’ पुणे विद्यापीठावर रोहित पवारांचा गंभीर आरोप; सोशल मीडियावर मांडले पुरावे
शैक्षणिक बातम्या

‘3 लाखांत पदवी?’ पुणे विद्यापीठावर रोहित पवारांचा गंभीर आरोप; सोशल मीडियावर मांडले पुरावे

rohit pawar

Rohit Pawar: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणानंतर राज्यातील स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच आता पुणे विद्यापीठातील कथित पदवी गैरव्यवहाराचा मुद्दा चर्चेत आला आहे. अवघ्या ३ लाख रुपयांत बी.कॉम. पदवी दिल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी विद्यापीठाची प्रेसनोट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या प्रकरणावरून त्यांनी सरकार आणि प्रशासनावर सवाल उपस्थित केले आहेत. नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घेऊया.

महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवणारा एक कथित गैरप्रकार समोर आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पैशांच्या बदल्यातबनावट पदवी देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून राज्य सरकार आणि विद्यापीठ प्रशासनावर टीका केली आहे. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी विद्यापीठाची अधिकृत प्रेसनोट सोशल मीडियावर शेअर करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा: पार्थ पवार-कायनात दारा यांचा शाही साखरपुडा; पुण्यात रंगला मान्यवरांच्या उपस्थितीतील भव्य सोहळा, पाहा खास क्षण

रोहित पवारांनी काय आरोप केले?

रोहित पवार यांनी सोशल मोडियावरील पोस्टमध्ये म्हटले की, स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटनांनंतर आता नामांकित विद्यापीठातूनही पैशांच्या मोबदल्यात पदव्या मिळत असल्याचे आरोप समोर येत आहेत. अशा घटना राज्याच्या शैक्षणिक व्यवस्थेसाठी गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.

त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये विद्यापीठाच्या प्रेसनोटचा उल्लेख करत, या प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती यांनी स्वतःलक्ष घालून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, असेही त्यांनी म्हटले.

नेमकं प्रकरण काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, महेश कदम नावाच्या व्यक्तीने आपल्या मुलाच्या शिक्षणासंदर्भात चौकशी करण्यासाठी विद्यापीठाशी संपर्क साधला होता. यावेळी एका कर्मचाऱ्याने बी.कॉम. पदवी मिळवून देण्यासाठी 3 लाखांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नंतर व्यवहार कमी रकमेवर ठरल्याचे आणि काही रक्कम ऑनलाइन पद्धतीने दिल्याचाही दावा करण्यात आला.

मात्र, संबंधित प्रमाणपत्रावर विद्यापीठाचे जुने नाव असल्याचे लक्षात आल्यानंतर संशय निर्माण झाला. त्यानंतर संबंधितांनी व्यवहाराचे तपशील आणि डिजिटल पुराव्यांसह विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली.

विद्यापीठ प्रशासनाची भूमिका

विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या प्रेसनोटनुसार, या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्यात आली. प्राथमिक तपासानंतर वित्त व लेखा विभागातील कर्मचारी रमेश मुखेकर याला निलंबित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

तसेच या प्रकरणी पुण्यातील चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

तपासात कोणत्या मुद्द्यांची चौकशी?

या प्रकरणातील मुख्य आरोपी परीक्षा विभागाशी संबंधित नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्याला कथित गैरप्रकार करण्यासाठी अंतर्गत यंत्रणेची मदत मिळाली होती का, इतर कर्मचारी किंवा अधिकारी यामध्ये सहभागी होते का, याचाही तपास केला जात आहे.

राजकीय वातावरण तापले

या प्रकरणानंतर राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. दुसरीकडे, प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने तपास पूर्ण झाल्यानंतरच सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत.

सध्या पोलिसांचा तपास आणि विद्यापीठाच्या अंतर्गत चौकशीचा अंतिम अहवाल महत्त्वाचा मानला जात असून, त्यानंतरच या कथित गैरप्रकाराबाबत अधिकृत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts