• Home
  • राजकारण
  • आळंदीत संग्राम भंडारेंकडून लवांडेवर शाई हल्ला अन् जिवे मारण्याची धमकी
Top News

आळंदीत संग्राम भंडारेंकडून लवांडेवर शाई हल्ला अन् जिवे मारण्याची धमकी

Vikas Lavande Shai Attack

Vikas Lavande Shai Attack : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)चे प्रवक्ते विकास लवांडे (Vikas Lavande) यांच्यावर आळंदी परिसरात किर्तनकार संग्राम भंडारे (Sangram Bhandare) आणि त्यांच्या साथीदारांनी शाई फेकून हल्ला (Shai Attack ) केल्याची घटना समोर आली आहे. हल्लादरम्यान लवांडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

असा घडला घटनाक्रम

विकास लवांडे यांनी सांगितल्याप्रमाणे, आज सकाळी आळंदी येथे दशक्रियेच्या कार्यक्रमानिमित्त त्यांचे प्रवचन होते. प्रवचन संपल्यानंतर ते पुण्याच्या दिशेने निघाले असताना वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे व त्यांच्यासोबत १० ते १५ जणांनी दोन-तीन गाड्यांमधून त्यांना निर्जन ठिकाणी अडवले. हल्लेखोरांनी लवांडे यांना गाडीतून बाहेर काढून त्यांच्या अंगावर शाईच्या दोन-तीन बाटल्या रिकाम्या केल्या. त्यांना धक्काबुक्की केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यातील काही जणांकडे बंदुका देखील होत्या, असे लवांडे यांनी सांगितले. लोक जमत असताना हल्लेखोर पळून गेले.

विकास लवांडे यांची भूमिका

घटनेच्या लगेच नंतर विकास लवांडे यांनी एक व्हिडीओ जारी करून संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यांनी संग्राम भंडारे व त्यांच्या साथीदारांचा तीव्र निषेध व्यक्त केला. “या सर्व गुंडांवर तत्काळ कारवाई व्हावी. जोपर्यंत त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत मी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात सत्याग्रह सुरू ठेवणार आहे,” अशी स्पष्ट भूमिका लवांडे यांनी घेतली आहे. त्यांनी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

रोहित पवार यांची प्रतिक्रिया

या घटनेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. एक्स (ट्विटर) वर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, “महाराष्ट्राच्या थोर वारकरी संप्रदायात घुसखोरी करणाऱ्या कट्टरतावाद्यांविरोधात विकास लवांडे गेल्या काही दिवसांपासून पुराव्यांसह आवाज उठवत आहेत. त्याच रागातून हा भ्याड हल्ला करण्यात आला आहे. यापूर्वी ज्ञानोबा-तुकोबांनाही अशाच मनुवादी वृत्तीने छळण्यात आले होते. आम्ही अशा हल्ल्यांना भीक घालणार नाही.”रोहित पवार यांनी सरकारला आवाहन करत आरोपींवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची, विकास लवांडे यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्याची आणि हल्ल्यात सहभागी सर्व गुंडांना अटक करण्याची मागणी केली. “यापुढे लवांडे यांना काही झाले तर सरकार जबाबदार राहील,” असा इशाराही त्यांनी दिला.

प्रकरणाची पार्श्वभूमी

विकास लवांडे हे वारकरी संप्रदायातील काही मुद्द्यांवर पुराव्यांसह प्रश्न उपस्थित करत असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याचे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले आहे.सध्या या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. घटनेच्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts