Dynasty politics leaders’ relatives tickets : महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचा बोलबाला पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आल्यात. ठाकरेंच्या शिवसेनेने ६ नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिलीय. तर भाजपने ४, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ३, तर काँग्रेसने पक्षातील २ नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिलीय. मुंबईसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना, भाजप, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे अशा सर्वच राजकीय पक्षांकडून घराणेशाही जोमात असून कार्यकर्ते मात्र कोमात असल्याचे दिसून येत आहेत.
हेही वाचा – सत्तेत एकत्र, महापालिकेत बिनसलं! भाजप-शिवसेना १६ ठिकाणी एकमेकांविरोधात लढणार
मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 उमेदवार घराणेशाहीतून आल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पहिल्या यादीत माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिकडे काँग्रेसमध्ये आमदार अस्लम शेख यांच्या कुटुंबात दोघांना तिकीट देण्यात आलं आहे. तर भाजपात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे भाऊ आणि वहिनीला उमेदवारी मिळाली आहे. कोणत्या पक्षात कोणत्या नेत्याच्या नातेवाईकाला उमेदवार देण्यात आलीय याची लिस्ट आपण पाहूयात. मुंबई महापालिकेत घराणेशाहीचा बोलबाला त्यावर एक नजर टाकू..
ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६ नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी
ठाकरेंच्या शिवसेनेने प्रभाग क्रमांक ५४ मधून आमदार सुनील प्रभू यांचा मुलगा अंकित प्रभू याला उमेदवारी दिली. प्रभाग क्रमांक ६४ मधून आमदार हारून खान यांची मुलगी सबा खान यांनी उमेदवारी देण्यात आलीय. प्रभाग क्रमांक ८९ मधून माजी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गितेश राऊत यांनी उमेदवारी दिली. प्रभाग क्रमांक १५० मधून माजी आमदार प्रकाश फातर्फेकर यांची मुलगी सुप्रदा फातर्फेकर यांनी उमेदवारी दिलीय. प्रभाग क्रमांक २२५ मधून माजी आमदार अशोक धात्रक यांच्या मुलाला उमेदवारी दिलीय.
राहुल नार्वेकरांच्या घरात दोन जणांना उमेदवारी
याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माजी मंत्री नवाब मलिक यांचे बंधु कप्तान मलिका, बहिण सईदा खान आणि आणि त्यांचे बंधू कप्तान मलिक यांची सून बुशरा नदीम मलिक यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर आणि वहिनी हर्षिता नार्वेकर आणि बहिण गौरवी शिवलकर यांना तिकीट देण्यात दिलंय. याशिवाय माजी आमदार राज पुरोहित यांचा मुलगा आकाश पुरोहित यांना उमेदवारी दिलीय. तर माजी खासदार किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांना पुन्हा तिकीट मिळालंय. काँग्रेसकडून आमदार अस्लम शेख यांची बहीण कमरजा सिद्दिकी, आणि मुलगा हैदर अली शेख यांनी उमेदवारी दिलीय त्यामुळे सर्व राजकीय पक्षांत घराणेशाहीचा बोलबाला पाहायला मिळतंय.
घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित होताच नेत्यांकडून सारवासरव
कार्यकर्त्यांकडून आणि सोशल मीडियावरही घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा नेत्यांनी सारवासरव केली आहे. महापालिकांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक मानली जाते. लोकसभा आणि विधानसभेसाठी कार्यकर्ते आपल्या नेत्यांसाठी जीवाचं रान करतात. आधीच युती आणि आघाडीच्या समीकरणात मेहनत घेतलेले वॉर्ड दुसऱ्या पक्षाला गेल्यानं कार्यकर्त्यांच्या मनात अन्यायाची भावना आहे. मात्र, महापालिका निवडणुकीतही नेत्यांचाच मुलगा, लेक, जावई, भाऊ, अशांना तिकीटं मिळणार असतील तर कार्यकर्त्यांनी आयुष्यभर सतरंज्याच उचलायच्या का? असा सवाल कार्यकर्ते एकमेकांनाच विचारताना दिसत आहेत.











