NEET Paper Leak Protest: NEET पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला आता महाराष्ट्रातूनही मोठा राजकीय पाठिंबा मिळताना दिसत आहे. ठाकरे बंधूंनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ २६ जुलै रोजी मुंबईत मोठ्या मोर्चाची घोषणा केली आहे.
NEET प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र मैदानात उतरणार आहेत. येत्या २६ जुलै रोजी मुंबईत मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा ठाकरे बंधूनी केली आहे.
जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात येणार आहे. NEET पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांवरील कारवाई आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी या मोर्चातून आवाज उठवला जाणार आहे.
हेही वाचा: घरात नांदेल सुख-शांती! फक्त वास्तुनुसार ‘या’ वस्तू ठेवा; लक्ष्मीचा वास राहील सदैव
शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चा
मुंबईतील आंदोलनाची सुरुवात शिवाजी पार्क येथून होणार असून मोर्चा सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाणार आहे. या आंदोलनाला कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज ठाकरे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये या प्रकरणाबाबत नाराजी असल्याचे त्यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, मोर्चाच्या शेवटी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन सरकारला योग्य निर्णय घेण्याची सद्बुद्धी मिळावी, यासाठी प्रार्थना करण्यात येईल.
NEET प्रकरणावरून सरकारवर टीका
NEET परीक्षेतील गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असल्याचा आरोप ठाकरे बंधूंनी केला आहे. परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
राज ठाकरे यांनी सांगितले की, या मुद्द्यावर केवळ एका व्यक्तीच्या राजीनाम्याचा प्रश्न नसून संपूर्ण परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांकडून आंदोलनाला पाठिंबा?
या मोर्चामध्ये महाविकास आघाडीतील काही घटक पक्ष सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी विविध संघटनाही या आंदोलनात सहभागी होऊ शकतात.
दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरणावरून केंद्र सरकारवर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. आता मुंबईतील ठाकरे बंधूंच्या आंदोलनामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.









