Raigad Car Accident | रायगड (Raigad) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटाजवळ एका कारचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. एक स्कॉर्पिओ कार थेट दरीत कोसळून हा मोठा अपघात झाला आहे. तर या अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रायगडमधील या अपघातानं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – तेल बाजारातून दिलासादायक बातमी; कच्च्या तेलाचे भाव घसरले, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?
नेमका अपघात कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, रायगडमधील आंबेनळी घाटाजवळून एक स्कॉर्पिओ गाडी जात असताना अचानक ती खोल दरीत कोसळली. महाबळेश्वर आणि पोलादपूर दरम्यान असलेल्या आंबेनळी घाटावर हा अपघात घडला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातात स्कॉर्पिओमध्ये असलेल्या आठही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच प्राथमिक माहितीनुसार, ही स्कॉर्पिओ गाडी सातारा जिल्ह्यातील आसगाव गावातील असून हा अपघात नेमका कसा घडला, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाहीये.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आणि बचाव पथकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. सध्या स्कॉर्पिओमधील आठ जणांचा मृत्यू झाला असून या सर्वांच्या मृतदेहांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. आत्तापर्यंत बचाव पथकांनी दोन मृतदेह यशस्वीरित्या बाहेर काढले आहेत. 500 ते 700 फूट खोल दरीतून आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उर्वरित मृतदेहांचा शोध सुरू आहे.
स्थानिक अधिकारी, गिर्यारोहक आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. मात्र, खोल दरी आणि अवघड भूभागामुळे बचाव कार्यात मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. रात्रीच्या अंधारात मृतदेहांचा शोध घेणं आव्हानात्मक ठरत आहे. पण, दिवस उजाडताच बचाव कार्याला गती मिळण्याची शक्यता आहे. तसेच या अपघातातील मृतांची नावे समोर आली आहेत. अंश समीर चव्हाण (वय 19), रितेश राजेंद्र लोखंडे (वय 22), सुहास जितेंद्र लोखंडे (वय 20), उत्कर्ष आनंद शिंगटे (21), निखिल अभिमन्यू शिंगटे (25), महेश अनिल पवार (25), आदित्य अशोक साळुंखे (21), राजेश अशोक काटकर (वय 35) अशी अपघातात मृत पावलेल्यांची नावे आहेत.
दरम्यान, आंबेनळी घाटावर झालेल्या या अपघाताने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आंबेनळी घाट हा पूर्वीपासूनच अत्यंत धोकादायक मानला जातो आणि येथे वारंवार रस्ते अपघात होत असतात. अशातच आता हा नवीन अपघात झाल्याने आंबेनळी घाट परिसरात एकच खळबळ उडाली आहे.







