• Home
  • महाराष्ट्र
  • आंबेनळी घाटात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, पोलादपूर पोलिसांकडून तपासाला वेग
Top News

आंबेनळी घाटात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, पोलादपूर पोलिसांकडून तपासाला वेग

Body of an unidentified woman

Woman’s body : महाबळेश्वर पोलादपूर जाणाऱ्या आंबेनळी घाट परिसरात एक अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह मोरीत कोंबून ठेवलेला आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना पोलादपूर तालुक्यातील बावलीटोका खाली व चिरेखिंडच्या वर मुख्य रस्त्यालगत उघडकीस आली. प्राथमिक तपासात हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – धक्कादायक! 19 वर्षांच्या मुलानं वडिलांची केली हत्या, नंतर मृतदेहाचे तुकडे केले अन्…; कबुलीजबाब ऐकून पोलिसही हादरले

आज सकाळी घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परिसरात तीव्र दुर्गंधी जाणवली. संशय आल्याने त्यांनी रस्त्यालगतच्या मोरीत पाहिले असता एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. त्यांनी तत्काळ पोलादपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

फॉरेन्सिक पथकानेही पाहणी केली

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून फॉरेन्सिक पथकानेही पाहणी केली आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. तिचे वय अंदाजे ३० ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच मागील काही दिवसांतील बेपत्ता महिलांच्या तक्रारींची पडताळणी करण्यात येत आहे. मोबाईल लोकेशन व इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत.

पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण

दरम्यान, आंबेनळी घाट हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा मार्ग असल्याने या घटनेमुळे नागरिक व पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात पोलीस गस्त वाढवावी आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.पोलादपूर पोलिसांनी लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts