Raj Thackeray on Tapovan tree cutting : नाशिकमध्ये 2027 साली सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. हा कुंभमेळा पार पाडण्यासाठी साधू महंताना राहण्यासाठी नाशिक येथील तपोवनातील 1800 झाडांवर महापालिकेकडून हातोडा चालवण्यात येणार असून 1150 एकर जागेवर साधूग्राम उभारण्यात येणार आहे. यासाठी 1800 झाडांची कतल केली जाणार आहे. यामुळे परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळल्याचे पहायला मिळणार असून या महापालिकेच्या निर्णया विरोधात नाशिककर, पर्यावरणप्रेमींसह अनेक सेलिब्रिटी देखील रस्त्यावर उतरले आहेत. आता या प्रकरणात शिवसेना उद्धव ठाकरे यांनी कडाडून विरोध दर्शवला होता. आता राज ठाकरे यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
काय लिहिलंय फेसबुक पोस्ट मध्ये
आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारने १८०० झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ताकाळात पण कुंभमेळा झाला. त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या.
त्यावेळच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता, त्यामुळे कामं करताना जनतेला काय हवं आहे याचा विचार केला गेला. एकूणच नियोजन इतकं उत्कृष्ट होतं की तेव्हाच्या महापौरांचा,नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून आणि
तत्कालीन आयुक्तांचा, प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून, थेट अमेरिकेत सत्कार झाला होता. आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागली नाहीत. मग आत्ता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत ?
बरं ही झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील, असली पोकळ आश्वासनं सरकारने देऊच नयेत कारण असं कधी होत नाही. आशा आशयाची फेसबुक पोस्ट करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
सरकारने संधिसाधूपणा करू नये
ते पुढे म्हणाले की, सरकारकडे जर दुसरीकडे पाचपट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधुग्राम करा. सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधिसाधूपणा करू नये. आणि काही कोटी झाडं लावल्याची घोषणा
भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली होती, जी झाडं कुठे दिसली नाहीत. असो. असे म्हणत सरकारवर निशाणा साधलाय.
कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची
आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, साधूंच्या नावाने ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची ! इतकाच विचार या सरकारचा असणार ! नाहीतरी सध्या महाराष्ट्रात दुसरं काय सुरू आहे ? जमिनी गिळणं नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हेच सध्या सत्ताधारी मंत्री, आमदार , त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळं करताना दिसतायत असेही ते म्हणाले.
हे ही वाचा : एकही झाड आम्ही तोडू देणार नाही; सयाजी शिंदे यांचा सरकारसह गिरीश महाजनांवर टिकास्त्र
तुम्ही ठाम रहा, तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील
नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे. नाशिकरांना माझं आवाहन आहे की तुम्ही ठाम रहा, तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील. यामध्ये खरतर कोणतेच राजकारण नाही ,
या आत्ता होणाऱ्या निवडणुकांनंतर देखील आमचा या वृक्षतोडीला विरोधच राहील ! माझं सरकारला आवाहन आहे की उगाच संघर्ष वाढवू नका. लोकांचं काय म्हणणं आहे त्याचा कधीतरी आदर राखला जाईल असं पहा.
तरीपण सरकारने संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेच्या बरोबर या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच आणि असेलच असे देखील त्यांनी या पोस्ट मध्ये लिहिलंय.












