Shinde faction internal conflict : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेसाठी भाजप-शिवसेना युतीची घोषणा झाली आहे. यामुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद उफाळला आहे. काही पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे देण्यास सुरुवात केलीय. माजी नगरसेवक व माजी सभागृह नेते कैलास शिंदे यांनी पक्षाकडे थेट स्वत:चीच हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तर तिकडे कल्याण ग्रामीण उपशहर प्रमुख मनोज चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. पुढील काळात आणखी कोण राजीनामा देणार का? पाहाणे महत्त्वाचं ठरणार आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक व माजी सभागृह नेता कैलास लखा शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाकडे पत्र लिहून थेट पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. आपल्या पत्रात त्यांनी सध्याच्या राजकारणावर घणाघाती टीका करत आज निष्ठेला किंमत नाही, आर्थिक क्षमता हाच निकष झाला आहे’ असा गंभीर आरोप देखील अप्रत्यक्ष शिंदे यांनी केलाय. त्यामुळे कल्याणच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
हेही वाचा – पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार- अजित पवारांनी केलं जाहीर
ही निवडणूक फक्त पैसेवाल्यांसाठी आहे
‘निवडणूक आयोगाने चार प्रभागांचा पॅनल तयार केल्यामुळे नोकरी करणाऱ्या किंवा सर्वसामान्य आर्थिक परिस्थितीतील व्यक्तीला निवडणूक लढवणे अशक्य झाले आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे तेच निवडणूक लढवू शकतात, ही निवडणूक फक्त पैसेवाल्यांसाठी आहे असा थेट आरोप त्यांनी केला. त्यांच्या प्रभागात सुमारे ५२ हजार मतदार असून चार प्रभागांचा एकत्रित पॅनल लढवणे आर्थिकदृष्ट्या अशक्य आहे,’ असं कैलास शिंदे म्हणाले.
पक्षाकडे स्वत:ची हकालपट्टी करण्याची मागणी
वीस वर्ष शिवसेनेत काम केल्यानंतरही ऐनवेळी युती झाल्याने कार्यकर्त्यांवर घरी बसण्याची वेळ येते, हे अन्यायकारक आहे. पक्ष सोडण्यामागे जागावाटप हे कारण नसून, आपण राजकारणातून पूर्णपणे बाहेर पडू इच्छितो आणि म्हणूनच पक्षाकडे स्वत:ची हकालपट्टी करण्याची मागणी केल्याच शिंदे यांनी सांगितलं. याशिवाय, काही भाजप नगरसेवकांच्या वर्तनावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या वागणुकीमुळे परिसरात हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांचे काम मी कधीच करणार नाही असे ठाम मत त्यांनी मांडले.
कल्याण ग्रामीण उपशहर प्रमुख मनोज गणपत चौधरींचा राजीनामा
कैलास शिंदे यांनी राजीनामा दिला असतानाच आता दुसरीकडे कल्याण ग्रामीण उपशहर प्रमुख मनोज गणपत चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. २०१८ पासून आपण इच्छुक उमेदवार होतो आणि पक्षाकडून संधी व योग्य सन्मान दिला जाईल, असं आश्वासनही देण्यात आलं होतं. मात्र युती झाल्यानंतर आपल्याला डावललं जाईल, अशी शंका आल्यानंतर आपण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याकडे राजीनामा दिलाय.
महापालिका निवडणुकीआधी राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे
‘सध्या कुठल्याही दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. मात्र युतीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपण निराश झाल्याचे त्यांनी मान्य केलयं. सलग होत असलेले हे राजीनामे आणि उघडपणे करण्यात आलेले आरोप यामुळे कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटातील अंतर्गत वाद आता उफाळून आलाय. महापालिका निवडणुकीआधी राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत,’ असं मनोज चौधरी म्हणाले.












