Rahuri Shani Shingnapur road accident : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी–शनिशिंगणापूर रस्त्यावर आज मंगळवारी सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्स आणि तीनचाकी रिक्षा यांच्यात झालेल्या जोराच्या धडकेत रिक्षामधील तब्बल चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १० हुन अधिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हेही वाचा – 5 हजारांची लाच मागणारे मुख्याध्यापिका ACBच्या जाळ्यात; गुन्हा दाखल
शनिशिंगणापूर रस्त्यावरील उंबरे गावानजीक असलेल्या तांबे पेट्रोल पंपासमोर शनिशिंगणापूर कडून राहुरी कडे चाललेल्या ट्रॅव्हल्स गाडीने तीन चाकी प्रवासी रिक्षाला समोरासमोर जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की रिक्षाचा जागीच चक्काचूर झाली असून ट्रॅव्हल्स देखील बाजूला जाऊन पलटी झाल्याने रिक्षामधील प्रवाशांचा मृत्यू झाला तर ट्रॅव्हल्स मधील काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली. नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिस व ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून राहुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून पुढील तपास सुरू आहे.












