Parth Pawar Controversy: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मानभेत पुन्हा समोर आले असून काही ज्येष्ठ नेत्यांनी शारद पवार(Sharad Pawar) यांच्याकडे पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या कार्यपद्धतींबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. यामुळे पक्षातील गटबाजीचे चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
रुसो बाई रुसो आणि कोपऱ्यात बसो या राष्ट्रवादी सुरू झालेल्या नाराजीचा एपिसोड आता थेट पवारांच्या दरबारी पोहचला आहे. कारण काही नेत्यांनी नातू पार्थ पवारांच्या वर्तनाची तक्रार थेट शरद पवारांकडे केल्याची चर्चा आहे, त्यात पार्थ पवारांच्या वर्तवणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच दादा असताना असं होतं…दादा असताना तसं होतं…Parth Pawar’असा अडचणींचा पाढाच या नेत्यांनी पवारांकडे मांडलाय. सुनील तटकरे यांनी अलिकडेच पवारांची भेट घेतली, त्याभेटवेळी आधीच तिथं पटेल उपस्थित असल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळे पार्थ पवार विरुद्ध तटकरे-पटेल असा थेट सामना सुरू झाला आहे. राष्ट्रवादीतला हा घोळ नेमका काय? जाणून घेउयात
महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहिलेल्या पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याच्या चर्चांना आता सूत्रांच्या हवाल्याने मोठा दुजोरा मिळाला आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका अत्यंत वरिष्ठ आणि बड्या नेत्याने थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पार्थ पवार यांच्या वर्तनाबद्दल आणि कार्यपद्धतीबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
हेही वाचा: मनोज जरांगे आज अंतरवाली सराटीत बैठक घेणार; मराठा आरक्षणावरून पुन्हा संघर्षाची शक्यता
राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ
अजितदादांच्या (Ajit Dada) अनुपस्थितीत किंवा त्यांच्या काहीशा पडद्यामागे राहण्यामुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष आता तीव्र झाला असून, हा संपूर्ण वाद मिटवण्यासाठी अखेर शरद पवार यांनाच ‘कुटुंबप्रमुख’ म्हणून मध्यस्थी करण्याची विनंती या नेत्याने केल्याचे समजते. या सर्व घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, पक्षातील वादळी वाट आता थेट पवारांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) अंतर्गत निर्णय प्रक्रियेत आणि संघटनात्मक बाबींमध्ये पार्थ पवार यांचा हस्तक्षेप कमालीचा वाढला आहे. पार्थ पवार (parth Pawar) यांच्या याच वाढत्या प्रभावामुळे पक्षातील अनेक जुने-जाणते आणि निष्ठावंत नेते स्वतःला डावलले जात असल्याची भावना अनुभवत आहेत. याच अस्वस्थतेचा स्फोट अखेर या बड्या नेत्याच्या तक्रारीच्या रूपाने झाला आहे.
या नेत्याने शरद पवारांची भेट घेऊन अत्यंत स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. “आम्हीही या पक्षासाठी, या संघटनेसाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. रक्ताचे पाणी करून पक्ष उभा करण्यात आमचेही योगदान आहे. त्यामुळे पक्षात आमचा मान-सन्मान आणि आदर राखला गेला पाहिजे, अशी आमची रास्त अपेक्षा आहे,” असे या नेत्याने पवारांना सांगितल्याचे खात्रीलायक सूत्रांचे म्हणणे आहे.
शरद पवारांकडे मांडलेली नाराजी
या नेत्याचा मुख्य आक्षेप हा आहे की, ज्या नेत्यांनी पक्षाला कठीण काळात साथ दिली, ज्यांच्याकडे दांडगा राजकीय अनुभव आहे, त्यांना बाजूला सारून पार्थ पवार यांच्या शब्दाला जास्त महत्त्व दिले जात आहे. निर्णय प्रक्रियेत ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले जात असल्यामुळे पक्षातील ज्येष्ठ फळीत कमालीचा असंतोष पसरला आहे. आमचा स्वाभिमान आणि राजकीय अस्तित्वाला कुठेतरी ठेच पोहोचत असल्याची भावना या नेत्याने शरद पवारांकडे बोलून दाखवली आहे.
अजित पवारांचा उल्लेख
शरद पवारांकडे गाऱ्हाणे मांडताना या बड्या नेत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचा आवर्जून उल्लेख केला. “अजितदादा जेव्हा पूर्णपणे सक्रिय असायचे आणि पक्षाची धुरा सांभाळायचे, तेव्हा पक्षात असे प्रकार कधीच घडत नव्हते,” अशी खंत या नेत्याने व्यक्त केली. अजित पवारांच्या प्रशासकीय आणि संघटनात्मक कौशल्याचे कौतुक करत या नेत्याने म्हटले की, दादांच्या काळात प्रत्येक नेत्याला, कार्यकर्त्याला त्याचा योग्य तो सन्मान मिळत होता. ज्येष्ठ नेत्यांच्या अनुभवाचा आदर केला जात होता आणि कोणालाही उपेक्षित वाटेल अशी परिस्थिती निर्माण होऊ दिली जात नव्हती. मात्र, सध्याची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून अजितदादांच्या काहीशा शांत राहण्याचा किंवा अनुपस्थितीचा फायदा घेऊन निर्णय प्रक्रियेत एकाधिकारशाही आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप या नेत्याने केला आहे. दादांच्या अनुपस्थितीत पक्षाची घडी विस्कटत चालली असून, यामुळे कार्यकर्त्यांमध्येही चुकीचा संदेश जात असल्याकडे या नेत्याने पवारांचे लक्ष वेधले.
कौटुंबिक मध्यस्थीची मागणी
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाची आणि संवेदनशील बाब म्हणजे, हा राजकीय वाद आता राजकीय पातळीवर न राहता कौटुंबिक पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. तक्रारदार नेत्याने शरद पवारांना केवळ एक राजकीय नेते म्हणून नव्हे, तर ‘कुटुंबप्रमुख’ म्हणून या विषयात हस्तक्षेप करण्याची गळ घातली आहे. “पवारांनी कुटुंबप्रमुख म्हणून पुढाकार घ्यावा आणि पार्थ पवारांना योग्य ती समज द्यावी,” अशी थेट मागणी या बड्या नेत्याने केली आहे.पवार कुटुंबात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे स्थान नेहमीच सर्वोच्च राहिले आहे. राजकीय मतभेद कितीही असले, तरी कौटुंबिक पातळीवर त्यांचे शब्द अंतिम मानले जातात. याच अधिकाराचा वापर करून शरद पवारांनी पार्थ पवारांना पक्षात सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आणि ज्येष्ठांचा आदर करण्याची तंबी द्यावी, अशी या नेत्याची इच्छा आहे. जर वेळीच यावर नियंत्रण मिळवले नाही, तर पक्षातील हा असंतोष उफाळून येईल आणि त्याचे गंभीर परिणाम पक्षाच्या भविष्यावर होऊ शकतात, असा इशाराही या नेत्याने दिल्याचे समजते.
पक्षातील अंतर्गत समीकरणे तापली
राष्ट्रवादीतील परिस्थिती अशीच राहिल्यास आगामी काळात रोहित पवार यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडण्याची…म्हणजेच पटेल, तटकरे असे अनेक नेते काही वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे, रोहित पवार यांचे 22 आमदार फुटणार असल्याचे दावे राष्ट्रवादीच्या आत्ता जरी फेटाळून लावली असली तरी त्यांच्या पक्षात काहीतरी वेगळंच शिजतंय हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय, तसेच अजितदादा गेल्यापासून पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या एक चांगला संवाद राहिला आहे, त्यामुळे पवार विरुद्ध पवार संघर्ष टाळण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीतील राजकीय वैर कमी करण्यासाठी कुटुंब हा एकच धागा अत्यंत महत्त्वाचा ठरु शकतो, त्यामुळे बाहेरील नेत्यांना बाजुला सारून सध्या पार्थ पवार काही बोल्ड निर्णय घेत असल्याचीही चर्चा आहे.
पार्थ पवार यांच्या राजकारणातील प्रवेशापासूनच त्यांच्यावर अनेकदा टीका झाली आहे. मागील काही निवडणुकांमधील त्यांचे अपयश आणि त्यानंतर पक्षातील वाढता हस्तक्षेप हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. आता तर पक्षातीलच एका वरिष्ठ नेत्याने त्यांच्याविरुद्ध बंड पुकारल्यासारखी परिस्थिती निर्माण केल्यामुळे पार्थ पवारांच्या राजकीय परिपक्वतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
तोडगा काय?
या सर्व तक्रारीनंतर आता चेंडू पूर्णपणे शरद पवार यांच्या कोर्टात आहे. शरद पवार या संवेदनशील विषयावर काय तोडगा काढतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ते खरोखरच ‘कुटुंबप्रमुख’ म्हणून पार्थ पवारांना समज देऊन हा वाद मिटवतात, की पक्षातील या बड्या नेत्याची समजूत काढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तूर्तास, या अंतर्गत वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी आणि नाराजी नाट्य पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून, यामुळे पक्षांतर्गत सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षातील हा अंतर्गत वाद अधिक तीव्र होऊ नये म्हणून शरद पवार हे दोन्ही बाजू ऐकून घेऊन लवकरच काही ठोस पावले उचलण्याची शक्यता आहे.












