Solapur Love Marriage Crime : सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील बार्शी शहराजवळ एका पतीने आपल्याच पत्नीची भररस्त्यात अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. चारचौघांसमोर पतीने पत्नीचा रस्ता अडवला आणि तिच्यावर चाकूने सपासप ५० वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बार्शी-परंडा रोडवर घडली. या थरारक हत्याकांडामुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा आणि बार्शी शहर हादरून गेले असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या काही महिन्यांपूर्वीच या दोघांनी अत्यंत कठीण परिस्थित आणि घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता. मात्र लग्नाचा महिना उलटायच्या आतच या सुखी संसाराचा असा रक्तरंजित शेवट होईल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. पण असं का घडलं?, काही दिवसांपूर्वीच जी धनश्री ऋषिकेशचा जीव होती, त्याच ऋषीकेशनं धनश्रीचा जीव एवढ्या क्रूर पद्धतीनं का घेतला? याच्या शोधात पोलिसांसह संपूर्ण सोलापूर जिल्हा आहे. मयत विवाहितेचे नाव धनश्री पाटील असे असून, जाच्यावर खुनाचा आरोप आहे त्या क्रुर पतीचे नाव ऋषिकेश पाटील आहे.
दोघेही सुशिक्षित असून एका नामांकित बँकेत कामाला
प्राथमिक माहितीनुसार, ऋषिकेश आणि धनश्री हे दोघेही सुशिक्षित असून एका नामांकित खासगी बँकेत कार्यरत होते. एकाच क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्यांची ओळख झाली आणि हळूहळू या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. एकमेकांना नीट समजून घेतल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्याही घरच्यांच्या विरोधाभासातून काही महिन्यांपूर्वीच त्यांचा प्रेमविवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस अत्यंत आनंदात गेले. मात्र, हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. लग्नाला महिनाही पूर्ण झाला नव्हता, तोच त्यांच्यात खटके उडू लागले. वेगवेगळ्या कारणांवरून आणि कौटुंबिक बाबींवरून दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले होते. हे वाद इतके टोकाला जातील आणि त्यातून एखाद्याच्या जिवावर बेतेल, अशी कोणालाही तिळमात्र शंका नव्हती.
जुन्या घरगुती भांडणावरून पुन्हा एकदा भररस्त्यात बाचाबाची
रविवारी रात्री दोघांमध्ये मोठा झाला. त्यानंतर सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे धनश्री बँकेच्या कामासाठी तिच्या स्कूटीवरून बार्शी-परंडा रस्त्याने जात होती. तिची माहिती काढून पती ऋषिकेशने तिचा पाठलाग सुरू केला. तो स्वतःजवळ एक धारदार चाकू बाळगून होता, धनश्री बार्शी शहराजवळील बार्शी-परंडा रोडवर पोहोचली असता, ऋषिकेशने अचानक तिच्या स्कूटी समोर आपली गाडी आडवी लावून तिला थांबवले. भररस्त्यात गाडी अडवल्यामुळे धनश्री अचंबित झाली. त्यानंतर ऋषिकेशने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांच्यातील जुन्या घरगुती भांडणावरून पुन्हा एकदा भररस्त्यात बाचाबाची सुरू झाली. धनश्रीने त्याला शांत करण्याचा किंवा तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु ऋषिकेशचा राग अनावर झाला होता. तो पूर्णपणे संतापलेला होता. दोघांमधील शाब्दिक वाद शिगेला पोहोचला आणि धनश्रीला काही समजण्याच्या आतच ऋषिकेशने आपल्या खिशातून धारदार चाकू काढला. अत्यंत क्रूरतेने धनश्रीवर पहिला वार केला.
अंगात फूत स्वार झालेल्या ऋषिकेशने धारदार शस्त्राने ५० वार केले
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे धनश्री गोंधळून गेली आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी ओरडू लागली. मात्र, ऋषिकेशवर अंगात जणू भूत स्वार झाले होते. त्याने आजूबाजूला असलेल्या लोकांची किंवा वाहनांची अजिबात पर्वा केली नाही. तो धनश्रीवर एकामागून एक सपासप वार करत राहिला. धनश्रीने स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी खूप धडपड केली, तिने हात पुढे करून वार झेलण्याचा प्रयत्न केला, परंतु ऋषिकेशच्या अमानुष ताकदीपुढे आणि धारदार शस्त्रापुढे तिचा काहीच निभाव लागला नाही. त्याने तिच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर, गळ्यावर, छातीवर आणि पोटावर तब्बल ५० वार केले. या क्रूर हल्ल्यामुळे धनश्री गंभीररीत्या जखमी होऊन रस्त्यावर कोसळली आणि संपूर्ण रस्ता तिच्या रक्ताने माखून गेला.
वाढत्या कौटुंबिक हिंसेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा आणि वाढत्या कौटुंबिक हिंसेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुशिक्षित वर्गामध्येही संयमाचा अभाव आणि हिंसक प्रवृत्ती कशा प्रकारे वाढत चालली आहे, याचे हे एक विदारक उदाहरण मानले जात आहे. ज्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्याची शपथ घेतली, त्याच व्यक्तीने अशा प्रकारे आयुष्याचा अंत करावा या घटनेने मृत धनश्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या माहेरच्या लोकांनी आरोपी ऋषिकेशला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास बार्शी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत.











