Sanjay Raut: विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. २० जुलै हा दिवस “डरपोक दिवस” म्हणून जाहीर करावा, अशी मागणी करत त्यांनी सरकार विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला घाबरत असल्याचा आरोप केला.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, देशातील युवकांनी लोकशाही मार्गाने आपला संताप व्यक्त केला. मात्र, आंदोलन करणाऱ्या तरुण-तरुणींवर पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधूराचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेची तुलना त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाशी करत, “तेव्हा जनरल डायरने गोळीबार केला होता, तर आता ‘जनरल कायर’ने लाठीमार केला,” अशी टीका केली. (Latest LS Marathi News)
राऊत यांनी पुढे दावा केला की, आंदोलनादरम्यान अनेक विद्यार्थ्यांना दुखापती झाल्या असून, त्यांचा आक्रोश पाहून मन हेलावल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा: जेपी नड्डा भेटीत तोडगा नाही; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी CJP चे आंदोलन कायम
“सरकार विद्यार्थ्यांना घाबरत आहे”
राऊत (Sanjay Raut)यांच्या मते, सरकार विद्यार्थ्यांच्या आवाजाला दडपण्याचा प्रयत्न करत आहे. “हुकूमशाही पद्धतीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला. (Politcal news)
ते म्हणाले की, आंदोलनानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर आंदोलकांचीही भेट घेतली असून, आंदोलनाला पाठिंबा कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलन देशभर नेण्याचे आवाहन
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधी पक्षांनी या आंदोलनाला व्यापक पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. हा मुद्दा विरोधी पक्षांच्या बैठकीतही मांडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, युवक नेते आदित्य ठाकरे आंदोलनाचे नेतृत्व करत असून, राज्यासह देशभर अशाच प्रकारची आंदोलने सुरू राहतील.
सरकारवर पुन्हा आरोप
राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर विद्यार्थ्यांच्या भावना दुर्लक्षित केल्याचा आरोप करत, आंदोलन ज्या मुद्द्यांवर सुरू आहे त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची टीका केली. “काल क्रांतीची ठिणगी पडली असून ती आता देशभर पसरल्याशिवाय राहणार नाही,” असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांनाही रोखल्याचा दावा
राऊत यांनी दावा केला की, पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणार होते. मात्र, शंभू सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करून त्यांना रोखण्यात आले. त्यामुळे अनेक शेतकरी सीमेवरच थांबले असून, तेही आपल्या मागण्यांसाठी आंदोलनात सहभागी होण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले.









