Maharashtra SIR 2026: महाराष्ट्रातील SIR-2026 प्रारूप मतदार यादीत 2.70 लाखांहून अधिक मतदारांच्या वयाची नोंद चुकीची झाल्याचे समोर आले होते. जन्मवर्ष 1900 नोंदवल्यामुळे निर्माण झालेली ही तांत्रिक त्रुटी निवडणूक आयोगाने अखेर दुरुस्त केली आहे.
SIR Voter List Maharashtra: महाराष्ट्रातील SIR २०२६ च्या (Maharashtra SIR 2026) प्रारूप मतदार यादीत(Voter List Correction) लाखो मतदारांच्या वयाबाबत गंभीर विसंगती समोर आली होती. तब्बल २ लाख ७ हजार ३१३ मतदारांचे जन्मवर्ष १९०० नोंदवले गेल्याने त्यांच्या वयाची नोंद १०१ ते १५० वर्षांपर्यंत पोहोचली होती. अखेर भारतीय निवडणूक आयोगाने या तांत्रिक चुकीची दुरुस्ती केली आहे.
नेमकी चूक काय होती?
महाराष्ट्रात मतदार (SIR Voter List Maharashtra) याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची ( SIR ) प्रक्रिया सुरू असताना प्रारूप यादीतील माहितीमध्ये मोठी त्रुटी आढळली. अनेक मतदारांच्या नोंदीमध्ये (Voter Data Accuracy) जन्मवर्ष १९०० असे नमूद झाल्यामुळे त्यांचे वय प्रत्यक्षापेक्षा खूप जास्त दिसत होते. या प्रकारामुळे मतदार यादीतील माहितीच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित झाले.
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ही बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर संबंधित माहितीची तपासणी करून वयाच्या नोंदीमधील विसंगती दूर करण्यासाठी कार्यवाही करण्यात आली.
हेही वाचा: काही निर्णय ठरतील गेमचेंजर? १४ ऑक्टोबरला ‘या’ राशींनी राहावं सतर्क!
नाशिक जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत सर्वाधिक नोंदी
उपलब्ध माहितीनुसार, चुकीच्या नोंदींचा सर्वाधिक परिणाम नाशिक जिल्ह्यातील (Nashik Voter List) तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये दिसून आला. कळवण (अनुसूचित जमाती), चांदवड आणि देवळाली (अनुसूचित जमाती) या मतदारसंघांतील एकूण 2,37,974 मतदारांच्या नोंदींमध्ये ही त्रुटी आढळली.
उर्वरित 32,339 मतदार राज्यातील अन्य भागांमध्ये नोंदवले गेले होते. त्यामुळे ही समस्या केवळ एका मतदारसंघापुरती मर्यादित नसून राज्यातील विविध भागांतील मतदार नोंदींशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले.
माहिती मिळवण्यासाठी वारंवार पाठपुरावा
ही त्रुटी विशेष सखोल पुनरीक्षणापूर्वीच्या मतदार यादीतच होती की पुनरीक्षणाच्या प्रक्रियेदरम्यान निर्माण झाली, याचा शोध घेण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने निवडणूक आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडे तपशील मागवला होता.
यासाठी 2 सप्टेंबर रोजी पहिली आणि 8 सप्टेंबर रोजी दुसरी विनंती करण्यात आली. संबंधित मतदारांची पूर्वीच्या यादीतील जन्मतारीख व वय, तसेच SIR-2026 अंतर्गत भरलेल्या गणना अर्जांमधील जन्मतारखांची माहिती एक्सेल स्वरूपात मागवण्यात आली होती.
मात्र, आवश्यक तपशील वेळेत उपलब्ध न झाल्याने महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी 17 सप्टेंबर रोजी वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त मनीष गर्ग यांच्याशी पत्रव्यवहार केला. माहिती तंत्रज्ञान विभागाला आवश्यक डेटा लवकर उपलब्ध करून देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली होती.
निवडणूक आयोगाकडून अखेर दुरुस्ती
या प्रकरणाची दखल घेत भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांच्या वयाबाबत निर्माण झालेली तांत्रिक विसंगती दूर केली. जन्मवर्ष चुकीचे नोंदवल्यामुळे हजारो नव्हे, तर लाखो मतदारांच्या वयाच्या नोंदींमध्ये फरक दिसत होता. दुरुस्तीनंतर या विशिष्ट त्रुटीचे निराकरण करण्यात आले आहे.
मतदार यादीतील अचूकतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत
मतदार यादी तयार करताना जन्मतारीख, वय आणि इतर वैयक्तिक तपशीलांची अचूक नोंद होणे अत्यंत महत्त्वाचे असते. मोठ्या प्रमाणावर डेटा हाताळताना तांत्रिक चुका झाल्यास त्याचा परिणाम मतदारांच्या नोंदींवर होऊ शकतो, हे या घटनेतून समोर आले आहे.
त्यामुळे मतदार याद्यांचे डिजिटायझेशन करताना माहितीची पडताळणी, सॉफ्टवेअरमधील त्रुटींचे परीक्षण आणि अंतिम यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी डेटा तपासणी या बाबींना अधिक महत्त्व देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.









