Sugar Price Hike: सणासुदीचा काळ जवळ येत असताना साखरेच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या काही आठवड्यांत साखरेच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून, बाजारातील उपलब्धता आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
सरकारी आकडेवारीनुसार, 20 जुलै रोजी साखरेचा सरासरी किरकोळ दर सुमारे 48.18 रुपये प्रति किलो होता. मात्र 22 ऑगस्टपर्यंत हा दर वाढून 55.70 रुपये प्रति किलोवर पोहोचला. त्यामुळे आगामी गणेशोत्सव आणि इतर सणांच्या काळात साखरेचे दर आणखी वाढू नयेत, यासाठी सरकारने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
उत्पादन घटल्याचा परिणाम
साखरेच्या किमती वाढण्यामागे यंदा (sugar price festive season) उत्पादनात अपेक्षित घट हे महत्त्वाचं कारण मानलं जात आहे. सुरुवातीला देशात सुमारे 343 लाख टन साखरेचं उत्पादन होईल, असा अंदाज होता. मात्र आता हा अंदाज कमी करून जवळपास 306 लाख टन करण्यात आला आहे.
हेही वाचा: 12 हजार अर्ज, पण निवड फक्त 80 विद्यार्थ्यांची! IIM बंगळुरूमध्ये नव्या UG स्कूलची सुरुवात
ऊस पिकावर रेड रॉट आणि टॉप बोरर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यातच काही भागांत अतिवृष्टी आणि पाणी साचल्याने उसाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.
दरम्यान, सणासुदीच्या काळात मागणी वाढणे आणि बाजारात साखरेची साठेबाजी होण्याची शक्यताही दरवाढीमागे असल्याचं सांगितलं जात आहे. (sugar prices today)
व्यापाऱ्यांवर स्टॉक लिमिट
साठेबाजीला आळा घालण्यासाठी सरकारने साखर व्यापाऱ्यांसाठी 400 टनांची स्टॉक लिमिट निश्चित केली आहे. हा नियम 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत लागू राहणार आहे.
1 सप्टेंबरपासून मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करणाऱ्या संस्थांनाही त्यांच्या 15 दिवसांच्या गरजेपेक्षा जास्त साठा ठेवता येणार नाही.
10 लाख टन साखरेची आयात
देशांतर्गत बाजारात पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने 10 लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे. तसेच साखर कारखान्यांना 15 ऑक्टोबरपासून गाळप सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सरकारच्या मते, या निर्णयांमुळे ऑक्टोबरमध्ये साखरेचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात बाजारातील उपलब्धता सुधारून दरांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते.
आंतरराष्ट्रीय बाजारातही दर वाढले
जागतिक बाजारातही साखरेच्या पुरवठ्यावर दबाव आहे. 30 जून ते 22 ऑगस्टदरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेची किंमत 474 डॉलरवरून 552 डॉलर प्रति टन झाली आहे. त्यामुळे भारतातील बाजारावरही त्याचा परिणाम होत आहे.
आता सरकारच्या उपाययोजनांमुळे साखरेचा पुरवठा वाढतो का आणि आगामी सणासुदीत ग्राहकांना दरवाढीपासून दिलासा मिळतो का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.



