Palghar Mokhada Crime: पालघरच्या मोखाड्यात धर्मांतराचा कथित प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार समोर आला आहे. १८ वर्षीय तरुणाच्या तक्रारीवरून २२ महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया.
पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात धर्मांतराचा कथित (Palghar conversion case) प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वाकडपाडा गावातील १८ वर्षीय विद्यार्थ्याला धार्मिक साहित्य देऊन विशिष्ट धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मोखाडा पोलिसांनी २२ महिलांविरोधात गुन्हा दाखल (22 women booked )केला असून, सध्या कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास काही महिला संबंधित तरुणाच्या घरी गेल्या होत्या. त्यापैकी एका महिलेने (religious conversion allegation) त्याला धार्मिक पुस्तके, त्यात ‘न्यू टेस्टामेंट’चाही समावेश असल्याचे सांगितले जाते, देण्याचा प्रयत्न केला. ही पुस्तके वाचल्याने आजार बरे होतील आणि विविध समस्यांपासून संरक्षण मिळेल, असा दावा करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तरुणाने धार्मिक साहित्य स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर संबंधित महिलेने त्याच्या श्रद्धांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. तसेच देवी-देवतांची पूजा न करण्यास आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी महिलांना थांबवून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर तरुणाने २२ ऑगस्ट रोजी मोखाडा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.
पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सत्यवती बालकृष्ण कुंचे आणि कुसुम शिवराम कांबडी या दोन महिलांची नावे प्रमुख संशयित म्हणून समोर आली आहेत.
महिलांचा गट बाहेरून आला होता का, त्यामागे नेमकी कोणाची भूमिका होती आणि धर्मांतराच्या आरोपांमध्ये तथ्य किती आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच प्रकरणातील पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.








