Kiara Advani: यश आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘टॉक्सिक’च्या ट्रेलरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
ट्रेलरमध्ये दोघांमधील काही बोल्ड आणि इंटिमेट प्रसंग पाहायला मिळाल्याने सोशल मीडियावर कियाराला (Kiara Advani) मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता अभिनेत्रीने स्वतः या भूमिकेबाबत आणि चित्रपटाच्या अनुभवाविषयी मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली आहे.
बंगळुरूमध्ये ‘टॉक्सिक’च्या ट्रेलर लॉन्चचा (Toxic Movie Trailer) कार्यक्रम पार पडला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. या कार्यक्रमात कियाराने नादिया या आपल्या व्यक्तिरेखेबद्दल खुलासा केला.
तिने सांगितलं की, दिग्दर्शिका गीतू मोहनदास आणि यश यांनी नादियाच्या भूमिकेसाठी तिच्यावर सुरुवातीपासून विश्वास दाखवला. स्वतःला इतक्या वेगळ्या आणि धाडसी भूमिकेसाठी तयार असल्याची जाणीव होण्याआधीच या दोघांनी तिच्यातील अभिनेत्रीला ओळखलं, असं कियाराने म्हटलं.
‘ही भूमिका माझ्या करिअरसाठी महत्त्वाची’
कियाराच्या मते, ‘टॉक्सिक’मधील नादिया ही तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात वेगळ्या भूमिकांपैकी एक आहे. या व्यक्तिरेखेमुळे अभिनेत्री म्हणून स्वतःला नव्या पद्धतीने सादर करण्याची संधी मिळाल्याचं तिने सांगितलं. ‘टॉक्सिक’नंतर प्रेक्षकांना आपली वेगळी बाजू पाहायला मिळेल, असा विश्वासही कियाराने व्यक्त केला.
यशसोबतच्या सीन्सवर कियाराचं भाष्य
चित्रपटातील गाणी, टीझर आणि आता ट्रेलरमध्ये यश आणि कियारामधील काही इंटिमेट सीन्स दाखवण्यात आले आहेत. यामुळे सोशल मीडियावर कियारावर टीकाही झाली.
यावर प्रतिक्रिया देताना कियाराने नादिया या व्यक्तिरेखेचं एका शब्दात वर्णन करणं कठीण असल्याचं सांगितलं. ही भूमिका नेमकी काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनी संपूर्ण चित्रपट पाहावा, असं तिने सूचित केलं.
तसंच, यश आणि गीतू यांनी तिला या भूमिकेसाठी अक्षरशः ‘बिघडवलं’ असल्याचं कियारा गंमतीने म्हणाली. चित्रपट पाहिल्यानंतर या विधानाचा नेमका अर्थ प्रेक्षकांना समजेल, असंही तिने स्पष्ट केलं.
२६ ऑगस्टला चित्रपटगृहात झळकणार
‘टॉक्सिक’ हा चित्रपट २६ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यशच्या चाहत्यांसोबतच कियाराच्या चाहत्यांमध्येही या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता आहे.
ट्रेलरमधील अॅक्शन, यशची भूमिका आणि कियाराचा नवा अंदाज यामुळे चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. सोशल मीडियावरील टीकेला फारसं महत्त्व न देता कियाराने आपल्या भूमिकेबद्दल आत्मविश्वासाने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.








